चातुर्मासासाठी नाशिकला पायी निघाल्या; कसारा घाटात अपघात, दोन महिला साध्वींचा जागीच मृत्यू

Mumbai Nashik Highway Accident: नाशिकच्या कसारा घाटात कंटेनर आणि ओमनीचा भीषण अपघात झाला. या अपघातात दोन जैन महिला साध्वींचा मृत्यू झाला आहे. 

मानसी क्षीरसागर | Updated: Jun 8, 2023, 03:52 PM IST
चातुर्मासासाठी नाशिकला पायी निघाल्या; कसारा घाटात अपघात, दोन महिला साध्वींचा जागीच मृत्यू title=
Nashik Kasara Ghat Accident death two Jain Sadhvi

योगेश खरे, झी मीडिया

Nashik Jain Sadhvi Accident: मुंबई -नाशिक महामार्गावर (Mumbai Nashik Highway) हॉटेल ऑरेंजसमोर कंटेनरच्या धडकेत दोन जैन महिला साध्वी यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. महिला साध्वींच्या मृत्यूने एकच खळबळ माजली आहे. 

कासारा घाटातून नाशिक येथील पवननगर स्थानकात चातुर्मास कार्यक्रमासाठी परम पूज्य श्री सिद्धाकाजी मसा व परमपूज्य श्री हर्षाईकाजी महाराज या पहाटेच्या सुमारास पायी प्रवास करत होत्या. त्याचवेळी ही दुर्घटना घडली आहे. 

कंटेनरने पिकअप आणि ओमनी कारला धडक दिल्यानंतर पायी चालणाऱ्या महिला साध्वी यांना धडक दिली. त्यांचा या अपघातात जागेवरच मृत्यू झाला. नाशिकला चातुर्मास करण्यासाठी पायी जात असताना अपघात झाल्यामुळं इगतपुरी तालुक्यातील जैन बांधवांनी शोक व्यक्त केला आहे. 

दरम्यान अपघातानंतर दोन्ही वाहनांचे चालक फरार झाले आहेत. बुधवारी पहाटे पाच वाजता ही घटना घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसंच, दोन्ही महिला साध्वींचे मृतदेह शवविच्छदनासाठी रुग्णालयात पाठवले आहेत. तसंच, अपघाताचा पंचनामा करुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही फरार चालकांचा पोलिस शोध घेत असून या प्रकरणी अधिक तपास करत आहेत. 

भंडाऱ्यात बाईकचा अपघात

भंडारा जिल्ह्याच्या साकोली - लाखांदूर रस्त्यावरील कुंबली गावाजवळ दुचाकीने ट्रॅक्टरला धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की दुचाकीस्वार युवकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दुचाकीवर मागे बसलेली महिला गंभीर जखमी झाली असून तिला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दुचाकीवरुन पती- पत्नी जात असताना कुंबली गावाजवळ दुचाकी चालकाचा ब्रेक लागला नाही. त्यामुळे त्याला दुचाकीवर नियंत्रण मिळवणे शक्य झाले नाही. त्यामुळं सरळ दुचाकी रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रॅक्टरला जाऊन आदळली

पालघरमध्ये टेम्पोचा अपघात

मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील दापचरी येथील टोल तपासणी नाक्यावरील टोल चुकवण्यासाठी मध्यरात्री सायवण कासा चारोटी या आडमार्गाचा वापर करणाऱ्या टेम्पोचा पावन फाटा येथे भीषण अपघात झाला आहे . झिंक डस्ट अल्ट्रा फाईंड नामक पदार्थाचे डबे वाहतूक करणाऱ्या आयशर टेम्पोवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने टेम्पो पलटी होऊन हा अपघात झाला आहे. या अपघातात टेम्पो चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे.

रात्रीच्या सुमारास अवजड वाहन दापचरी येथील टोल चुकवण्यासाठी याच आडमार्गाचा वापर करत असल्याने या मार्गावर अपघातांची मालिका सुरूच आहे . मात्र दुसऱ्या बाजूला आरटीओ विभाग आणि पोलीस याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येतोय.