योगेश खरे, झी मीडिया, नाशिक : घरात लहान मुलं असतील तर विशेष काळजी घ्या. लहान मुलं काय करतात, कुठे खेळताय यावर लक्ष ठेवा. शक्यतो त्यांना एकटं सोडू नका. कारण अशीच एक धक्कादायक घटना नाशिकमध्ये उघडकीस आली आहे.
खेळत असताना अचानक तोल जाऊन 18 महिन्यांच्या बालिकेचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना नाशिक शहरात समोर आली आहे. रविवारी रात्रीच्या सुमारास सिडकोतील पवन नगर भागातील साई ज्योत अपार्टमेंट इथं पहिल्या मजल्यावर ही घटना घडली.
समृद्धी राहुल खैरनार असं मृत बालिकेचे नाव आहे. सोसायटीच्या आवारात कोसळल्याने समृद्धी गंभीर जखमी झाली होती. त्यानंतर कुटुंबीयांनी तात्काळ तिला गंगापूर रोडवरील साफल्य हॉस्पिटल इथं दाखल केलं. तिच्या मेंदूत रक्तस्राव झाल्याने शस्त्रक्रिया करण्यात आली. पण समृद्धीच्या तब्येतीत सुधारणा झाली नाही. काही वेळातच तिचा मृत्यू झाला.
या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. .