सागर गायकवाड, झी मीडिया
Nashik News Today: नाशिकमध्ये (Nashik) भयंकर घटना घडली आहे. एका दहा वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. घरात भावासोबत झोका खेळत असतानाच एकाला गळफास लागल्याने त्याचा मृत्यू झाला. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. (Nashik Crime News)
राहत्या घरात झोका खेळत असताना झोक्याचा गळफास लागून दहा वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची घटना नाशिकच्या अंबडच्या म्हाडा कॉलनी परिसरात घडली आहे. या घटनेत दहा वर्षीय निखिल निंबा सौंदाणे याचा उपचाराच्या आधीच मृत्यू झाला आहे.
मयत निखिल याची आई शेजारी कामानिमित्त गेल्या होत्या. तर निखिलचे वडील भाजीपाला आणण्यासाठी बाजारात गेले होते. निखिल आणि त्याचा लहान भाऊ दोघेच घरात होते. दोघेही घरात टीव्ही बघत असताना पलंगावर बांधलेला झोका खेळत होते. त्याचवेळी झोका गोल गोल फिरल्याने झोक्याच्या दोराचा फास मानेला आवळला गेला. त्यामुळं निखिलला श्वास घेण्यास त्रास होत गेला. पण पलंगावर असल्याने त्याला ते जाणवले नाही. पण थोड्याच वेळात उंच झोका घ्यायच्या प्रयत्नात निखिलला गळफास लागला.
गळफास आवळला गेल्याने तो बेशुद्धहोऊन खाली पडला होता. निखिल काहीच हालचाल करत नाहीये हे पाहून त्याचा लहान भाऊ आईकडे धावतच गेला. निखिल झोक्यावरुन खाली पडला असून काहीच बोलत नसल्याचे सांगितले. त्यावेळी त्यांच्या आईने तात्काळ तिथे धाव घेतली. तिने आत जाताच पाहिले की निखिल निपचीत पडला होता. आईने त्याच्या गळ्याला आवळलेला फास कापून त्याला उठवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तरीही त्याने काहीच हालचाल केली नाही.
घटनेची माहिती मिळताच, आजूबाजूच्या रहिवाशांनी तात्काळ खासगी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले. मात्र, उपचार सुरु होण्यापूर्वीच डॉक्टरांनी निखिल यास तपासून मयत घोषित केले. या प्रकरणी संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. चुंचाळे पोलीस चौकीत अंबड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल अमीर शेख करीत आहे. निखिल याचा पश्चात आई-वडील तसेच सात वर्षाचा लहान भाऊ आहे.
यापूर्वीही नाशिकमध्ये अशा घटना वाढल्या आहेत. अंगावर पाणी पडल्यामुळं तर विहिरीत पडून काही लहान मुलांनी जीव गमावले आहेत. त्यामुळं पालकांनी मुलांवर अधिक लक्ष ठेवण्याची गरज आहे.