close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

...म्हणून आईकडूनच १४ महिन्यांच्या पोटच्या गोळ्याची क्रूर हत्या!

सोमवारी १४ महिन्यांच्या एका बाळाचा गळा आणि हाताची नस कापून हत्या करण्यात आल्याचं समोर आलं होतं

Updated: Jul 17, 2019, 11:13 PM IST
...म्हणून आईकडूनच १४ महिन्यांच्या पोटच्या गोळ्याची क्रूर हत्या!

किरण ताजणे, झी २४ तास, नाशिक : नाशिकमध्ये सध्या एका हत्येची जोरदार चर्चा आहे.... १४ महिन्यांच्या एका बाळाची हत्या आईनंच केली. धक्कादायक म्हणजे सारखी रडते म्हणून आईनं तिला चाकूनं मारुन टाकलं. १४ महिन्यांची स्वरा... सोमवारी तिचा गळा आणि हाताची नस कापून हत्या करण्यात आल्याचं समोर आलं. सार्वजनिक बांधकाम विभागात अभियंता असलेल्या मुकेश पवार यांची ती कन्या होती... या प्रकरणी स्वराची आई योगिता हिची भूमिका सुरुवातीपासूनच संशयास्पद होती. तिच्या दाव्यानुसार दुपारी २.०० वाजता ती कचरा टाकण्यासाठी फ्लॅटबाहेर गेली... तेवढ्यात एक चोरटा हातात चाकू घेऊन आला योगिताला घरात लोटून त्यानं दरवाजा बंद केला आणि बेडरूममध्ये झोपलेल्या १४ महिन्यांच्या स्वराचा गळा कापला.

योगितानं प्रतिकार केल्यावर चोरट्यानं तिलाही मारलं. या झटापटीत योगिता अर्धा तास बेशुद्ध होती. ती शुद्धीवर येताच तिनं स्वराला डॉक्टरांकडे नेलं, पण डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. पोलिसांनी तपास केला. पण या सगळ्यात स्वराची आई योगिताची भूमिका संशयास्पद वाटू लागली.

घरातले दागिने किंवा पैसे चोरीला गेलेले नाहीत. घरामध्ये झटापटीची कुठलीही चिन्हं दिसली नाहीत. आपण नखं कापत असताना चोरट्यानं हातातलं ब्लेड हिसकावल्याचं योगिता सांगते, पण चोराकडे चाकू असताना तो ब्लेक का हिसकावून घेईल... तसंच घरात नेलकटर असताना योगिता ब्लेडनं नखं का कापत होती? चोरट्याने फक्त हातावर मारल्यावर योगिता बेशुद्ध कशी पडली? असे अनेक प्रश्न पोलिसांना पडले होते. 

त्यानंतर योगिताकडे कसून चौकशी केली असता तिनं आपला गुन्हा मान्य केला, अशी माहिती नाशिक शहर पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी दिली.

कितीही बनाव केला, तरी पोलीस खरा गुन्हेगार शोधतातच... पण, योगितानं केलेली आपल्याच पोटच्या गोळ्याची हत्या फारच तक्रावून टाकणारी आहे.