तिजोरीत खडखडाट... महापालिकेच्या 'कार'भाराची चर्चा!

नाशिक महानगर पालिकेच्या तिजोरीत खडखडाट असताना मनपा प्रशासनाने पदाधिकाऱ्यांची कारची हौस भागविण्यासाठी लाखो रुपयांची उधळण केलीय. स्थायी समितीसह विविध विषय समित्यांचे सभपतीसाठी नव्या कोऱ्या १२ कार घेण्यात आल्यात... तर, दुसरीकडे मनपाच्या लाखो रुपयाच्या जुन्या कार नुकत्याच भंगारात विक्रीसाठी काढण्यात आल्यानं महापालिकेच्या या 'कार'भाराची सर्वत्र चर्चा सुरु आहे.

Updated: Nov 23, 2017, 01:36 PM IST
तिजोरीत खडखडाट... महापालिकेच्या 'कार'भाराची चर्चा! title=

मुकुल कुलकर्णी, झी मीडिया, नाशिक : नाशिक महानगर पालिकेच्या तिजोरीत खडखडाट असताना मनपा प्रशासनाने पदाधिकाऱ्यांची कारची हौस भागविण्यासाठी लाखो रुपयांची उधळण केलीय. स्थायी समितीसह विविध विषय समित्यांचे सभपतीसाठी नव्या कोऱ्या १२ कार घेण्यात आल्यात... तर, दुसरीकडे मनपाच्या लाखो रुपयाच्या जुन्या कार नुकत्याच भंगारात विक्रीसाठी काढण्यात आल्यानं महापालिकेच्या या 'कार'भाराची सर्वत्र चर्चा सुरु आहे.

पदाधिकाऱ्यांना कार... जनता वाऱ्यावर

नाशिक महापालिकेत सध्या नव्या कोऱ्या कारची प्रचंड चर्चा आणि क्रेझ आहे.  बहुतांश  नगरसेवकांना महागड्या आलिशान कारचं आकर्षण आहे हीच क्रेझ पदाधिकाऱ्यांमध्येही दिसून येते. स्थायी समिती सभपती, सभागृहनेता, प्रभाग सभापतीसह विविध समित्यांच्या सभापतींसाठी नव्या कोऱ्या १२ कार नागरिकांच्या कराच्या पैशातून घेण्यात आल्यात. विरोधी पक्षनेत्याच्या दिमतीलाही नवीन कार बहाल करण्यात आलीय. मनपाच्या तिजोरीत खडखडाट असल्यानं शहरात विकास कामांना कात्री लावली जातेय. त्याच वेळी तीन सियाज आणि नऊ स्विफ्ट डिझायर कार खरेदी करून महापालिकेच्या तिजोरीवर जवळपास ९२ लाख रुपयाचा बोजा टाकलाय.

कशासाठी हा खटाटोप?

एकीकडे नव्या कारसाठी लाखो रुपये मोजले जात असताना दुसरीकडे जुन्या वाहनांचा भांगरात लिलाव करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. यात कधीकाळी महापौरांची अलिशान सवारी असणारी ओपेल कार केवळ ३० हजार रुपयाला विक्रीत काढलीय. तर इतर लाखो रुपायची वाहनही कवडीमोल भावात विक्री केली जात असल्यान आश्चर्य व्यक्त केला जातंय.

खर्चाचा बोजा कुणावर?

नगरसेवकांची सोय लावण्यासाठी सत्ताधारी भाजपने तीन विषय समित्यांची निर्मिती करून सभापतीपदी तिघांची नियुक्ती केलीय. त्यांच्यासाठी कार दिल्यानंतर उपसभापतींनाही अलिशान कार आस लागलीय. येत्या काळात त्यांचेही लाड पुरविले जाणार का? याकडे नाशिककरांचे लक्ष लागलाय. कारण कोणी कितीही महागड्या वाहनातून कारभार केला तरी त्यासाठी लागणारा पैसा सर्वसामान्य नाशिककरांच्या खिशातूनच जातोय. त्याला कुठल्याच मुलभूत सुविधा पुरविल्या जात नाहीय, हे दुर्दैव...