'मला असं वाटतं की...'; गोविंदबागेतील दिवाळीला अजित पवार का गैरहजर? सुप्रिया सुळेंनीच सांगितलं कारण

Sharad Pawar Govindbaug Diwali Celebration Ajit Pawar: शरद पवारांसहीत संपूर्ण पवार कुटुंबाला शुभेच्छा देण्यासाठी गोविंदबाग येथे समर्थकांची गर्दी झालेली असतानाच अजित पवारांच्या अनुपस्थितीसंदर्भात सुप्रिया सुळेंनी भाष्य केलं आहे. 

स्वप्निल घंगाळे | Updated: Nov 14, 2023, 11:56 AM IST
'मला असं वाटतं की...'; गोविंदबागेतील दिवाळीला अजित पवार का गैरहजर? सुप्रिया सुळेंनीच सांगितलं कारण title=
प्रसारमाध्यमांशी बोलताना सुप्रिया सुळेंनी सांगितलं कारण

Sharad Pawar Govindbaug Diwali Celebration Ajit Pawar: सालाबादप्रमाणे यंदाही दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने बारामतीतल्या गोविंदबाग येथे पवार कुटुंब एकत्र आलं आहे. मात्र दरवर्षी होणाऱ्या या फॅमेली गेट टू गेदरला राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे पुतणे अजित पवार यंदा अनुपस्थित आहेत. शनिवारीच शरद पवार आणि अजित पवार हे दिवाळीनिमित्त  प्रतापराव पवार यांच्या निवासस्थानी एकमेकांना भेटले होते. याच वर्षी मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर अनेकांना सर्वात आधी शरद पवार आणि अजित पवार हे यंदाच्या दिवाळीसाठी एकत्र येणार का? असा प्रश्न पडला होता.

अजित पवार आलेच नाहीत

अजित पवार गोविंदबागमधील शरद पवारांच्या घरी जणार का या प्रश्नाचं उत्तर दुपारी साडेअकरापर्यंत तरी नाही असेच आहे. शरद पवारांसहीत संपूर्ण पवार कुटुंबाला शुभेच्छा देण्यासाठी गोविंदबाग येथे समर्थकांची गर्दी झालेली असतानाच अजित पवार या ठिकाणी आल्याचं सकाळी साडेअकरा वाजेपर्यंत आले नाहीत. मात्र अजित पवार का आले नाहीत यामागील कारण त्यांची चुलत बहीण आणि शरद पवार यांच्या खासदारकन्या सुप्रिया सुळेंनी दिलं आहे.

अजित पवार दिवाळीसाठी का अनुपस्थित?

अजित पवारांच्या अनुपस्थितीसंदर्भात प्रसारमाध्यमांशी बोलताना सुप्रिया सुळे यांनी, “दादाला (अजित पवार) डेंग्यू झाल्याचं सगळ्यांनाच माहीत आहे. मागील 20 ते 25 दिवसांपासून दादा कुठल्याच कार्यक्रमांना गेलेला नाही. रणजीत पवार आहेत आणि इतरही भाऊ आहेत," असं म्हटलं. पुढे बोलताना सुप्रिया सुळे यांनी, "मला असं वाटतं की जी गोष्ट आहे ती मोठ्या मनाने स्वीकारली पाहिजे. आहे त्या वास्तवात जगलं पाहिजे. अर्धा ग्लास कधीही रिकामा नसतो हे लक्षात ठेवलं पाहिजे,” असं सूचक विधान केलं. 

प्रत्येकजण आपली तब्बेत, जबाबदाऱ्या सांभाळतो

आपल्यासाठी कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती महत्त्वाची असल्याचं सांगताना सुप्रिया सुळेंनी रोहित पवारही पाडव्यानिमित्त गोविंदबागेत नाही असं म्हटलं आहे. “माझ्यासाठी माझ्या कुटुंबातली प्रत्येक व्यक्ती महत्वाची आहे. प्रत्येकजण आपली तब्बेत, जबाबदाऱ्या सांभाळतोय. आज रोहितही इथे आलेला नाही. तो संघर्ष यात्रेसाठी बीडला आहे. रोहितचा आम्हा सगळ्यांनाच सार्थ अभिमान आहे,” असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

जनतेला दिल्या शुभेच्छा

"मी आज महाराष्ट्राच्या मायबाप जनतेला दिवाळीच्या आणि पाडव्याच्या शुभेच्छा देते. सगळ्यांना हे वर्ष सुख समृद्धीचं आणि आनंदाचं जावो अशी प्रार्थनाही करते," असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या. "महाराष्ट्रावर महागाई, बेरोजगारी आणि दुष्काळाचं सावट आहे. त्यातून आपली मुक्तता होऊ दे एवढीच पांडुरंगाचरणी प्रार्थना करते," असं म्हणत सुप्रिया सुळेंनी जनतेला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.