'पडळकरांच्या तोंडाला काळं फासणार', राष्ट्रवादी काँग्रेसचा आंदोलनाचा इशारा

शरद पवारांवर टीका करत असताना भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांचा तोल घसरला आहे.

Updated: Jun 24, 2020, 04:22 PM IST
'पडळकरांच्या तोंडाला काळं फासणार', राष्ट्रवादी काँग्रेसचा आंदोलनाचा इशारा title=

मुंबई : शरद पवारांवर टीका करत असताना भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांचा तोल घसरला आहे. शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेले कोरोना आहेत, अशी अत्यंत खालच्या पातळीची टीका पडळकर यांनी केली आहे. पडळकर यांच्या या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे. पडळकर यांच्याविरुद्ध आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसने दिला आहे. 

गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्याच्या तीव्र प्रतिक्रिया महाराष्ट्रात उमटतील, असा इशारा राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी दिला आहे. तसंच ही भाजपची संस्कृती आहे का? देवेंद्र फडणवीसांनी याचं उत्तर द्यावं, असंही आव्हाड म्हणाले आहेत. 

धनंजय मुंडे यांनी पडळकर यांच्यावर या वक्तव्यावरुन निशाणा साधला आहे. नेम आणि फेम मिळवण्यासाठी शरद पवारांवर टीका केली जाते. बिरोबा यांना सुबुद्धी देवो, असं ट्विट धनंजय मुंडे यांनी केलं आहे. 

'पडळकर यांनी पातळी सोडून शरद पवारांवर टीका केली, याबद्दल त्यांनी माफी मागावी. त्यासाठी राष्ट्रवादी पुण्यात उद्या मंडईतील टिळक पुतळ्यासमोर आंदोलन करणार आहे,' असं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अंकुश काकडे यांनी सांगितलं. 

'विधानसभेवेळी पडळकरांसारखा व्हायरस बाजूला ठेवला, याबाबत बारामतीकरांचे आभार. तुमचं जेवढं वय नाही तेवढा काळ शरद पवार राजकारणात आहेत. पडळकर यांना मानसोपचार तज्ज्ञाची गरज आहे, त्यांनी भाजपची असभ्य संस्कृती खूप लवकर आत्मसात केली, ' अशी टीका रुपाली चाकणकर यांनी केली आहे. 

गोपीचंद पडळकर यांचे मानसिक संतुलन बिघडलेलं आहे, त्यांना मानसोपचार तज्ज्ञाची आवश्यकता आहे, त्याचा खर्चही राष्ट्रवादी युवक काँग्रेस उचलायला तयार आहे. पुढच्या वेळी बोलतांना कोणाबद्दल बोलत आहोत हे लक्षात ठेवा, नाहीतर राष्ट्रवादी युवक काँग्रेस धडा शिकवल्याशिवाय रहाणार नाही, असा इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष सूरज चव्हाण यांनी दिला आहे. 

'राष्ट्रवादी काँग्रेस गोपीचंद पडळकर यांचं तोंड काळं करून त्यांना चोप देणार,' असा इासार राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष नितीन देशमुख यांनी दिला आहे. 

'गोपीचंद पडळकरांचं शरद पवारांबद्दलचं वक्तव्य चुकीचं', भाजपने हात झटकले