मुंबई : महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेत विरोधी पक्षनेते फडणवीसांनी केलेल्या दाव्यांचा खुलासा केला. तसेच केंद्र सरकारकडून हक्काचे पैसे मिळाले नाहीत. एन ९५ मास्क, व्हेंटीलेटर अद्याप राज्याला मिळाले नसल्याचे यावेळी सांगण्यात आले. जयंत पाटील, बाळासाहेब थोरात आणि अनिल परब यांनी ही पत्रकार परिषद घेतली. यावेळी जयंत पाटील यांनी लॉकडाऊन संदर्भात देखील महत्वाचे विधान केले.
राज्यात सध्या ३१ मे पर्यंत लॉकडाऊन ४ सुरु आहे. पण राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा कमी होताना दिसत नाही. लॉकडाऊन हा शब्दप्रयोग न करता काही गोष्टी कशा पुर्वपदावर आणता येतील याचा विचार करुया असे सूचक विधान मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या भाषणात केले होते. दरम्यान राज्यातील लॉकडाऊन वाढणार की नाही हा प्रश्न विचारला जातोय.
२९ तारखेला आम्ही लॉकडाऊनच्या स्थितीचा आढावा घेऊ. बरीच स्थिती आटोक्यात असल्याचे जयंत पाटील म्हणाले. जिथे कोविड रुग्ण नाहीत किंवा अगदी कमी आहेत, तिथेले व्यवहार सुरळीत करण्याबाबत विचार करू असे पाटील म्हणाले. पण जिथे रुग्ण जास्त आहेत तिथे शिथिलता दिली जाणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
कोरोनात आम्ही लढतोय, तीनही पक्ष एकसंघ आहोत, उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी असल्याचा विश्वास जयंत पाटलांनी यावेळी व्यक्त केला. सरकार अंतर्विरोधात पडेल असे ते म्हणतात पण ते कोरोनाच्या लढाईत माणसं वाचवायला विरोधकांनी आमच्या बरोबर यायला हवं होतं, पण ते येत नाहीत हे दुर्दैव असल्याचेही पाटील म्हणाले.
राज्य सरकारने केलेल्या कामावर केवळ टीका करण्याचे काम फडणवीसांनी केले. सर्व मजुर बाहेर गेले आहेत आणि आपल्या अर्थव्यवस्थेवर त्याचा परिणाम होईल. महाराष्ट्रातील तरुणांमध्ये हे स्किल नाही असे फडणवीस म्हणाले. राज्यातील युवकांवर त्यांनी अविश्वास दाखवला. मागच्या ५ वर्षात केंद्र सरकारने स्किल इंडीया अंतर्गत काही गोष्टी दिल्या असतील तर त्यावर फडणवीसांचा विश्वास नाही.
केंद्राने आयएफएससी यंत्रणा गुजरातला नेण्याचा निर्णय २७ एप्रिल म्हणजे कोरोना संकटात घेतला. याचे समर्थन फडणवीस करतात. ७ लाखापेक्षा अधिक स्थलांतरित मजुर आपल्या गावी गेले. ८५ टक्के खर्च दिल्याचे पियुष गोयल म्हणाले. असे असते तर हे मजूर मोफत जायला हवे होते.
मुख्यमंत्री निधीला एकही रुपया न देता इथे निधी देऊ नये असे आवाहन केले. त्यामुळे भाजप महाराष्ट्राचा शत्रू आहे का ? असा प्रश्न उभा राहतोय. केंद्राने पीपीई आणि मास्क दिल्याचे फडणवीस म्हणाले. राज्यात १० दहा लाख पीपीई कीट, १६ लाख मास्क दिल्याचे ते म्हणाले.
पहिल्या टप्प्यात ४९ लाख १३ हजार ५०० एन९५ मास्क मागितले. पण ३० ट्क्के हून कमी आले. पीपीई किट्स, व्हेंटीलेटर, इन्फ्यूजन पंप आले नाही. आम्ही करत असलेल्या प्रयत्नामध्ये भाजप कुठे दिसत नाही. फडवणवीसांनी विरोधकांची भूमिका सोडून सहाय्याची भूमिका घ्यायला हवी. केंद्राने काही सूचना दिल्या आहेत पण आलेले पॅकेज परवडणारे नाही. कठीण प्रसंगात केंद्राकडून विशेष मदत मिळाली नसल्याचे पाटील यावेळी म्हणाले.