वर्षभरात तुझी नोकरी जाईल! नवाब मलिक यांनी समीर वानखेडेंना दिला इशारा

समीर वानखेडे भाजपचा म्होरक्या असल्याचा आरोपही नवाब मलिक यांनी केला आहे

Updated: Oct 21, 2021, 05:27 PM IST
वर्षभरात तुझी नोकरी जाईल! नवाब मलिक यांनी समीर वानखेडेंना दिला इशारा

मावळ : अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी एनसीबी (NCB) अधिकारी समीर वानखेडे (Samir Wankhede) यांना पुन्हा आव्हान दिलं आहे. वर्षभरात तुझी नोकरी जाईल, तुझा तुरुंगवास निश्चित आहे, असं आव्हान नवाब मलिक यांनी दिलं आहे. पुण्यातील मावळ इथं अल्पसंख्याक विभाग कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात नवाब मलिक बोलत होते. यावेळी मलिक यांनी एनसीबी कारवाई आणि भाजप नेत्यांवर जोरदार टीका केली.

राज्याची जनता हे सर्व पहात आहे, तुझी बोगसगिरी जनतेसमोर आणणार त्याच्या घरातले सगळे बोगस आहेत. माझ्या जावयाला तुरुंगात टाकले आणि आता मला फोन करतो, कोणत्या बापाच्या सांगण्यावरून हे करतोय? तुझा बाप कोण याचं उत्तर दे ना. तुझ्या बापाला मी घाबरत नाही. तुला तुरुंगात टाकल्या शिवाय मी गप्प बसणार नाही, असा हल्लाबोल नवाब मलिक यांनी केला आहे. 

समीर वानखेडे प्रसिद्धीसाठी लोकांना अडकवण्याचे काम करत आहे. समीर वानखेडे भाजपचा म्होरक्या आहे. तो बोगसगिरी करतो, त्यामुळेच या बोगस केसेस आहेत, त्या कोर्टात टिकणार नाहीत. येणाऱ्या काळात मी आणखी पुरावे सादर करणार आहे. या संदर्भात चालणारी तोडपाणी ही मालदीव आणि दुबईत चालते हे आम्हाला समजलंय. ही तोडपाणी थांबली पाहिजे, असा आरोपही नवाब मलिक यांनी केला आहे. 

कोरोना काळात संपूर्ण फिल्मइंडस्ट्री मालदीव आणि दुबईमध्ये असताना समीर वानखेडे यांच्या कुटुंबातील लोकही तिथे होते असा आरोप करत नवाब मलिक यांनी समीर वानखेडे मालदीव, दुबईमध्ये होते का? त्यांची लेडी डॉन मालदीवमध्ये गेली होती का? असे सवाल उपस्थि केले आहेत.