वडेट्टीवारांचं खोडसाळ राजकारण! नितीन गडकरी म्हणतात 'देवेंद्र फडणवीस माझ्या भावासारखे'

एकमेकांच्या विरोधात काड्या करणं आणि एकमेकांची जिरवणे ही काँग्रेसची परंपरा

Updated: Oct 21, 2021, 04:49 PM IST
वडेट्टीवारांचं खोडसाळ राजकारण! नितीन गडकरी म्हणतात 'देवेंद्र फडणवीस माझ्या भावासारखे' title=

नांदेड : नांदेड देगलूर बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीच्या (Deglur Assembly Bypoll) प्रचारात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडतायत. त्यात आता राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी केलेल्या एका वक्तव्याने नव्या वादाला सुरुवात झाली आहे. नांदेडमध्ये प्रचारसभेत बोलताना वडेट्टीवार यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) आणि नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्यात 36 चा आकडा असल्याचा दावा केला. तसंच फडणवीस यांची जिरवायची होती, असं नितीन गडकरी यांनी आपल्याला सांगितलं असा दावाही वडेट्टीवार यानी केला होता. 

खोडसाळ राजकरण करु नये

विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या वक्तव्यावर आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जोरादर टोला लगावला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या संदर्भात आपण विजय वडेट्टीवार यांना कधीही, कोणतीही गोष्ट गुपचूप सांगितलेली नाही, वडेट्टीवार यांनी तशी वक्तव्ये करून बेजबाबदार आणि खोडसाळ राजकारण करू नये, असा टोला नितीन गडकरी यांनी लगावला आहे. 

फडणवीस धाकट्या भावासारखे

विजय वडेट्टीवार यांच्या भाषणाची क्लिप पाहून मला आश्चर्य वाटले, त्यांचं वक्तव्य पूर्णतः निराधार, खोटे आणि बेजबाबदारपणाचे आहे. देवेंद्र फडणवीस माझ्यासाठी धाकट्या भावासारखे आहेत. शिवाय, ते माझ्या पक्षातील महत्त्वाचे नेते आहेत. एकमेकांच्या विरोधात काड्या करणं आणि एकमेकांची जिरवणे ही काँग्रेसची परंपरा आहे. त्यामुळे तशा प्रकारचा संभ्रम वडेट्टीवार आमच्याही बाबतीत निर्माण करू पाहतात, असेही गडकरी यांनी म्हटलं आहे. 

फडणवीसांच्या काळात महाराष्ट्राची प्रगती

फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात महाराष्ट्राची प्रगती झाली. विरोधी पक्ष नेते म्हणूनही ते उत्तम काम करीत आहेत. महाविकास आघाडीच्या चुकांवर नेमके बोट ठेवून ते लोकशाहीतील विरोधकांचे कर्तव्य निभावत आहेत. सरकार तीन पक्षांचे असले तरी काँग्रेसमध्ये नैराश्य आहे. त्यांना कुणीही मोजत नाही. त्यामुळे चर्चेत राहण्यासाठी वडेट्टीवार यांच्यासारखे काँग्रेसी नेते अशा प्रकारची वक्तव्ये करून गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न करतात, असा आरोपही  गडकरी यांनी केला आहे.