'अभिव्यक्तीवर हल्ला नको, पटत नसेल तर मत लिहून-बोलून विरोध व्यक्त करा'

गिरीश कुबेर यांच्या तोंडाला काळं फसल्या प्रकरणी काय म्हणाले शरद पवार पाहा व्हिडीओ

Updated: Dec 5, 2021, 06:29 PM IST
'अभिव्यक्तीवर हल्ला नको, पटत नसेल तर मत लिहून-बोलून विरोध व्यक्त करा'  title=

नाशिक : नाशिकमध्ये सुरू असलेल्या साहित्य संमेलनाला गालबोट लागलं आहे. ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्या चेह-याला काळं फासण्याचा प्रकार घडला आहे. संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी काळं फासलं आहे. 'रेनिसन्स स्टेट' या आपल्या पुस्तकात संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह लिखाण केल्याचा संभाजी ब्रिगेडचा आरोप आहे. 

साहित्य संमेलनात एका परिसंवादासाठी गिरीश कुबेर आले होते. त्यावेळी मंडपात जाण्यापूर्वी संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या चेह-याला काळी भुकटी फासली. कार्यकर्त्यांच्या हातात निषेधाची पत्रकंही होती. 

या प्रकरणावर राष्ट्रावादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. प्रत्येकाला व्यक्त होण्याचा अधिकार आहे. मात्र अशा प्रकारे गिरीश कुबेर यांना काळं फासणं हे चुकीचं आहे. गिरीश कुबेर यांच्या तोंडाला काळं फासण्याचा हा प्रकार निंदनीय आहे. असंही यावेळी पवार म्हणाले. 

अभिव्यक्ती स्वातंत्र्यामध्ये असं घडणं चुकीचं आहे. लिखाण पटलं नाही तर लिहून, बोलून विरोध करा असंही यावेळी शरद पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.दुसरीकडे गिरीश कुबेर यांना काळं फासणा-या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली आहे.

संभाजी ब्रिगेडनं पुस्तकावर बंदी घालावी आणि कुबेरांनी जाहीर माफी मागावी ही मागणी लावून धरली आहे.