राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी शरद पवारांची (Sharad Pawar) गुप्तपणे भेट घेतल्यानंतर चर्चांना उधाण आलं आहे. या भेटीमागे नेमका कोणता राजकीय अर्थ दडला आहे, यासंबंधी वेगवेगळ्या चर्चा सुरु आहेत. त्यातच आता विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar) यांनी शरद पवारांचा पाठिंबा मिळवला तरच अजित पवारांना मुख्यमंत्रीपद दिलं जाईल अशी ऑफर पंतप्रधान मोदींनी अजित पवार गटाला दिली असल्याचा दावा केला आहे. या सर्व घडामोंडींवर सुप्रिया सुळे यांनी आता भाष्य केलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवगंत नेते आर आर पाटील यांची आज जयंती असून यानिमित्ताने सुप्रिया सुळे यांनी त्यांना आदरांजली वाहिली. दरम्यान, यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना आर आर पाटील यांच्या आठवणींना उजाळा दिला. दरम्यान, पक्ष आणि राज्यात सुरु असलेल्या घडामोडींवरही भाष्य केलं.
विजय वडेट्टीवार यांच्या विधानासंबंधी विचारण्यात आलं असता त्यांनी म्हटलं की "आमच्यासाठी तरी सध्या लोकशाही आहे, त्यामुळे प्रत्येक पक्षाच्या नेत्याला जे वाटतं ते बोलण्याचा अधिकार आहे".
अजित पवारांनी केंद्रीय मंत्रीपदासाठी शरद पवारांना ऑफर दिल्याच्या दाव्यावर बोलताना त्यांनी सांगितलं की, "मी त्या बैठकीत नव्हते त्यामुळे तिथे काय झालं याची मला माहिती नाही. पण फक्त माझ्याच नाही तर दादाच्याही जन्माआधीपासून चोरडिया आणि पवार कुटुंबाचे ऋणानुबंध आहेत. शरद पवार आणि अतुल चोरडिया यांचे वडील कॉलेजात एकत्र होते. त्यामुळे आम्ही आणि चोरडिया कुटुंब भेटणं यात काही नवं किंवा वावगं, आश्चर्यजनक वाटणारं नाही. आमचे फार काळापासून प्रेमाचे संबंध आहेत. त्यामुळे त्यांना भेटणं, एकमेकांच्या सुख, दु:खात असणं हे सहा दशकापासून सुरु आहे. अनेकवेळा राजकीय मतभेद असतात, जे राजकारणात असले पाहिजेत. एन डी पाटील यांच्या पत्नी सरोज पाटील या शरद पवारांच्या सख्ख्या बहिण आहेत हे लोक विसरतात. अनेक धोरणात शरद पवार आणि एन डी पाटील एकमेकांच्या विरोधात उभे राहिले. पण म्हणून आत्याचं आमच्यावरील प्रेम कमी झालं नाही. आम्ही आमचे राजकीय विचार आणि कौटुंबिक नात्याचा ओलावा यात अंतर पडू दिलेलं नाही आणि आणणार नाही. आमची नाती आणि राजकीय मतं वेगळी आहेत. ही प्रगल्भता महाराष्ट्राच्या जनतेनंही दाखवलं आहे. त्यांनी कधीच शरद पवार आणि एन डी पाटील नात्यात का आहेत अशी विचारणा केली नाही".
पुढे त्यांनी सांगितलं की "तशीच परिस्थिती आज महाराष्ट्रात आहे. दादाला जे विचार योग्य वाटत असतील त्यांना लोकशाहीत मान्य केलं पाहिजे. आम्ही ज्या विचारांच्या बैठकीत बसतो ती दादापेक्षा वेगळी असू शकते. त्यात मला काही गैर वाटत नाही". दरम्यान, या बैठकीमुळे महाविकास आघाडीत फूट पडत असल्याचे दावे त्यांनी फेटाळले.
"मी नवाब मलिक आणि त्यांच्या कुटुंबाला अन्यायाविरोधात ज्याप्रकारे लढताना पाहिलं आहे. नवाब मलिक यांना अडचणीत कोणी आणलं? अन्याय कोणी केला? खोट्या केस कोणी टाकल्या? हे सर्वांना माहिती आहे. नवाब मलिकांवर कोणत्या काळात केस झाली हे सर्वांना माहिती आहे. मी नेहमी सत्याच्या बाजूने असते. कोणी कोणता राजकीय निर्णय घ्यायचा हे त्यांच्यावर असतं. ते माझ्या मोठ्या भावासारखे आहेत. पण केंद्राने त्यांच्यावर सूडाचं राजकारण केलं," असं सांगत सुप्रिया सुळे यांनी ते कोणत्या गटात जातील या प्रश्नाचं उत्तर दिलं.