धक्कादायक! चिमुकलीच्या पाठीत राहिली इंजेक्शनची सुई नातेवाईकांचे रुग्णालयावर आरोप

बाळाच्या पाठीत आढळून आली सुई रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे घटना घडली असा नातेवाईकांचा आरोप 

Updated: May 21, 2022, 09:27 PM IST
धक्कादायक! चिमुकलीच्या पाठीत राहिली इंजेक्शनची सुई नातेवाईकांचे रुग्णालयावर आरोप title=
संग्रहित

जालना -  जिल्हा महिला आणि बाल रुग्णालयात घडलेला धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. 5 दिवसांपूर्वीच जन्मलेल्या बाळाच्या पाठीत इंजेक्शनची सुई आढळून आली आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.रुग्णालयातीलच नर्सच्या हलगर्जीपणामुळे बाळाच्या पाठीत सुई राहिल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला आहे. 

जाफ्राबाद तालुक्यातील निमखेडामधील सुमित्रा जाधव या महिलेला प्रसूतीसाठी महिला आणि बाल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पाच दिवसापुर्वी या महिलेने मुलीला जन्म दिला. पाच दिवसांनी बाळाच्या आजीने बाळाला जवळ घेतले असता बाळाच्या पाठीवर सूज आल्याचे दिसले. तसेच पाठीत 'सुई' राहिली असल्याचे देखील आढळून आले. हा प्रकार बाळाच्या नातेवाईकांनी तपासणीसाठी आलेल्या डॉक्टरांना तात्काळ सांगितला.  

या प्रकरणानंतर बाळाची सोनोग्राफी केली असता पाठीत सुई आढळून आली. पाच दिवसांच्या बाळाच्या पाठीत सुई गेली कशी याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. रुग्णालयामधीलच नर्सेसच्या हलगर्जीपणामुळेच प्रकार घडला असा संशय बाळाच्या नातेवाईकांना आहे. तर रुग्णालयामधील डॉक्टरांनी बाळाच्या नातेवाईकांचे आरोप धुडकावलेत. नातेवाईकांनी बाळाला गुंडाळून ठेवलेल्या कपड्यातच ही सुई असल्याचे सांगत रुग्णालयाने या प्रकरणात हात वर उचले आहेत. शिवाय या प्रकरणावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.

दरम्यान बाळाच्या पाठीत असलेली सुई काढून देवू अशी डॉक्टरांनी नातेवाईकांना ग्वाही दिली आहे. या संबधित माहिती बाळाच्या नातेवाईक मंगला घुले यांनी झी चोवीस ताससोबत बोलताना दिली आहे.