close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

या नवीन खासदारांनी दिली ही आश्वासने

लोकसभेत जाणाऱ्या नवनिर्वाचित खासदारांना विकासाबाबत आश्वासन दिले आहे.

Updated: May 24, 2019, 10:09 PM IST
या नवीन खासदारांनी दिली ही आश्वासने
Pic Courtesy: ANI

मुंबई : देशात पुन्हा एकदा एनडीएचे सरकार स्थापन होणार आहे. राज्यातील शिवसेना-भाजप युतीला चांगले यश मिळाले. आता लोकसभेत जाणाऱ्या नवनिर्वाचित खासदारांना विकासाबाबत आश्वासन दिले आहे. पुढील पाच वर्षांत जे प्रश्न प्रलंबित आहेत, ते प्राधान्याने सोडविण्यात येणार आहेत.

डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार, कल्याण-डोंबिवली

सर्वांचे लक्ष लागलेले  लोकसभा मतदार संघ म्हणजे ठाण्यातील कल्याण डोंबवली मतदारसंघ. येथून शिवसेनेचे डॉ. श्रीकांत शिंदे यांनी बाजी मारली आहे. मला मिळालेले यश हे जनतेचे आहे. पुढील पाच वर्षांत वाहतूक, आरोग्यविषयक समस्या मार्गी लावणे, हे माझे ध्येय आहे, असे खासदार शिंदे म्हणालेत. 

डॉ. शिंदे पुढे म्हणालेत, दळणवळणाचे सक्षम जाळे उभारण्यासाठी रेल्वे समांतर रस्ता, जलवाहतूक, चांगले रस्ते, मेट्रो मार्गी लावण्याला प्राधान्य देणार आहे. जलवाहतुकीसाठी पाच वर्षांत जे प्रयत्न झाले. ते आता अस्तित्वात येतील. प्रवाशांची जीवनवाहिनी असलेल्या लोकलच्या फेऱ्या वाढवणे, प्रवास सुखकारक व्हावा, यासाठी मी कटिबद्ध आहे, अशी प्रतिक्रिया कल्याण लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे विजयी उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली. 

राजन विचारे, खासदार, ठाणे जिल्हा

राजन विचारे हे जवळपास ४ लाख १२ हजार मतांनी विजयी झालेत. विकासकामे केलेली आहेत, त्यांची पोचपावती मतदारांनी दिलेली आहे. त्यामुळे पुढील पाच वर्षांत जनतेचा विश्वास संपादन करून त्यांच्या विश्वासाला कोणत्याही स्वरूपाचा तडा न जाऊ देता, विकासकामे करणार आहे, असे नवनिर्वाचीत खासदार राजन विचारे म्हणालेत. ठाण्यासह नवी मुंबई आणि मीरा-भार्इंदरमध्ये जे काही प्रकल्प मंजूर झाले आहेत किंवा जे काही प्रकल्प सुरूहोणार आहेत, ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार आहे, असे राजन विचारे म्हणालेत.

राहुल शेवाळे, खासदार, दक्षिण मध्य मुंबई

दक्षिण मध्य मुंबईतून सलग दुसऱ्यांदा निवडून आलेले खासदार राहूल शेवाळे यांनी मुंबईच्या डिपी प्लानची अंमलबजावनी प्राधान्याने करण्याचा अजेंडा समोर ठेवला आहे. रखडलेला धारावी पुनर्वसनाचा प्रकल्प, बीडीडी चाळीचे पुर्नवसन तसेच बीकेसी प्रमाणेच वडाळा हे कॉपोरेट कार्यालयीन परिसर बनवणार असल्याचे आश्वासन दिले आहे. यासाठी तब्बल १४ लाख ४०० कोटी रुपयांचा निधी मुंबईसाठी आणणण्याचा प्रयत्न राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.  

रक्षा खडसे, खासदार, रावेर

येत्या पाच वर्षांत रावेर लोकसभा मतदारसंघातील सुमारे सहा हजार कोटींचा मेगा रिचार्ज प्रकल्प मार्गी लावणार आहोत. त्यासोबतच केंद्र तसेच राज्य सरकारच्या निधीतून गेली पाच वर्षे रखडलेली कामे पूर्ण करू, असे आश्वासन भाजप खासदार रक्षा खडसे यांनी दिले आहे. भुसावळ हे रेल्वेचं मोठे जंक्शन असल्याने रेल्वे कोच निर्मितीसाठी मोठा प्रकल्प भुसावळात आणण्याचा आपला मानस आहे. ब्रिटिशकालीन पाचोरा जामनेर मीटरगेज रेल्वेचं विस्तारीकरण करणार आहोत. तसेच बचत गटाच्या माध्यमातून महिलांचे सबलीकरण करणार, अशी ग्वाही खासदार रक्षा खडसे यांनी दिली आहे.

भावना गवळी, खासदार, यवतमाळ-वाशीम

आपल्या लोकसभा मतदारसंघात शेतकऱ्यांना दिलासा देणारे निर्णय घेऊ. वर्धा- यवतमाळ - नांदेड रेल्वे प्रश्न निकाली काढू. सोबतच तरुणांना नोकरीच्या संधी उपलब्ध होईल, सिंचन प्रकल्पांनाही गती देऊ, असा अजेंडा नवनिर्वाचित खासदार भावना गवळी यांनी पुढे ठेवला आहे. खुर्ची घेऊन खुर्ची तोडणे, अशा पद्धतीचे काम न करता सगळ्यांना सोबत घेऊन सकारात्मक कार्य करण्याची मनीषा शिवसेना खासदार भावना गवळी यांनी व्यक्त केली.