थॅलेसिमिया, सिकल सेल रुग्णांसाठी दिलासादायक बातमी

पूर्व विदर्भात मोठ्या प्रमाणात आढळणाऱ्या सिकल सेल आणि थॅलेसिमियाच्या रुग्णांकरता उत्तर नागपुरात अद्यावत रुग्णालय उभारणार असल्याची घोषणा, केंद्रीय मंत्री आणि नागपूरचे खासदार नितीन गडकरी यांनी केली आहे. 

Updated: Sep 10, 2017, 12:04 AM IST
थॅलेसिमिया, सिकल सेल रुग्णांसाठी दिलासादायक बातमी title=

नागपूर : पूर्व विदर्भात मोठ्या प्रमाणात आढळणाऱ्या सिकल सेल आणि थॅलेसिमियाच्या रुग्णांकरता उत्तर नागपुरात अद्यावत रुग्णालय उभारणार असल्याची घोषणा, केंद्रीय मंत्री आणि नागपूरचे खासदार नितीन गडकरी यांनी केली आहे. 

नागपुरात देशातल्या पहिला बोन मॅरो डोनर नोंदणी प्रकल्पाच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. नागपूरसह पूर्व विदर्भातल्या इतर पाच जिल्ह्यांमध्ये या रोगाचा मोठ्या प्रादुर्भाव असल्यानं, नागपुरात हे रुग्णालय उभारलं जाणार असल्याचं गडकरी म्हणाले. 

सर्व सामान्यांना माहिती नसलेल्या थॅलेसिमिया, सिकल सेलसारख्या रुग्णांना बोन मॅरोची आवश्यकता असते. संपूर्ण देशात बोन मॅरोची आवश्यकता असलेले सुमारे साडे तीन हजार रुग्ण दरवर्षी नव्यानं तयार होतात. एकट्या उत्तर नागपुरात बोन मॅरोची आवश्यक्ता असलेले सिकल सेलचे ४० हजार रुग्ण आहेत. अशा रुग्णांकरता नागपुरात आता सोय झाली आहे. 

बोन मॅरोचे दाते तसेच ज्यांना याची गरज आहे अशा दोघांची यादी या केंद्रात उपलब्ध राहणार असून, रक्तपेढीच्या धर्तीवरच हे केंद्र कार्य करणार असल्याचं राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितलं. 

या सोबतच सिकल सेल आणि थॅलेसिमियाच्या रुग्णांकरता उत्तर नागपुरात साडे चार एकर जागेवर अद्यावत रुग्णालय उभारण्याची घोषणा नितीन गडकरी यांनी केली. नागपुरातला हा बोन मॅरो डोनर नोंदणी प्रकल्प देशातला पहिलाच प्रकल्प असला तरी, राज्यातल्या सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हाच उपक्रम राबवणार असलयाची घोषणा गिरीश महाजन यांनी केली. रक्त आणि बोन मॅरोसाठी रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची होणारी भटकंती या प्रकल्पामुळे येत्या काळात थांबणार आहे.