ना दिवे, ना पणत्या... पण, दारात काळे आकाश कंदील!

सर्वत्र उत्साहात दिवाळी साजरा होत असली तरी औरंगाबादच्या फतेपूर गावात हा सण साजरा केला जात नाहीय. ना गावात कोणत्या घराला रंग दिला ना नवीन कपडे घेतले... ना घरासमोर दिवा जळतोय... तर काही घरांसमोर चक्क काळे आकाश कंदील लावून सरकारचा निषेध केला जातोय.

Updated: Oct 19, 2017, 08:28 PM IST
ना दिवे, ना पणत्या... पण, दारात काळे आकाश कंदील! title=

विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद : सर्वत्र उत्साहात दिवाळी साजरा होत असली तरी औरंगाबादच्या फतेपूर गावात हा सण साजरा केला जात नाहीय. ना गावात कोणत्या घराला रंग दिला ना नवीन कपडे घेतले... ना घरासमोर दिवा जळतोय... तर काही घरांसमोर चक्क काळे आकाश कंदील लावून सरकारचा निषेध केला जातोय.

मार्ग 'समृद्धी'चा की अंधाराचा...

औरंगाबादच्या जवळच असलेल्या फतेपूर या गावातील वातावरण पाहिलं तर या गावात ऐन दिवाळीत गावातील घरांमध्ये अंधकार पसरलाय. हे गाव यावेळी काळी दिवाळी साजरी करतंय... आणि याचं कारण आहे 'समृद्धी मार्ग'... फत्तेपूर गावची जवळपास ४०० लोकसंख्या आहे. गावातील साठ टक्के शेतकऱ्यांची जमीन समृद्धी महामार्गात जाणार आहे. काही शेतकऱ्यांची तर शंभर टक्के जमीन जाणार आहे. त्यात सरकारनं जमीन अधिग्रहण केली तर जायचं कुठं? हा प्रश्न असल्यानं गावकऱ्यांनी दिवाळी साजरी करण्याचा निर्णय घेतलाय.

त्यामुळे ना घराची रंगरंगोटी केली. ना नवीन कपडे घेतले. इतकंच नाही तर दारासमोर दिवाही लावला नसून काही शेतकऱ्यांनी घरासमोर काळे आकाश दिवे लावलेत.

घराबाहेर दिवाळीची रौनक नाहीच... मात्र, घरातील स्वयंपाक घरातही यावर्षी खमंग फराळाचा सुगंध दरवळत नाहीय. कारण घर जाणार मग आनंद काय साजरा करणार? अशी भावना महिलांनी व्यक्त केलीय.

गावातील नागरिकांचा समृद्धी महामार्गाला विरोध नाही. मात्र दर पत्रकात फत्तेपूर गावातील जमिनीला भाव मिळाला नाही. त्यामुळे कौडीमोल भावानं जमीन देण्यास नकार देत गावकऱ्यांनी ही काळी दिवाळी साजरी करण्याचा निर्णय घेतलाय.

औरंगाबादमध्ये फत्तेपूर नाही तर अनेक गावात विरोध होत आहे. त्यात काळी दिवाळी गावकरी साजरी केल्यानं सरकार पुढील अडचणी वाढतायत. त्यामुळे आता सरकार हा मार्ग पूर्ण करणार कसा, हे पाहण महत्त्वाचं ठरणार आहे.