...या संवेदनशील ठिकाणी 'बेजबाबदार' पर्यटकांना बंदी!

 या परिसरात बेतालपणे वर्तन करणाऱ्या पर्यटकांवर कडक कारवाई करणार असल्याचंही अधिकाऱ्यांनी म्हटलंय

Updated: Jun 29, 2018, 02:07 PM IST
...या संवेदनशील ठिकाणी 'बेजबाबदार' पर्यटकांना बंदी! title=

पुणे : पावसाळा सुरू झालाय... बाहेर पाऊस धो धो पडतोय... अशा वेळी पर्यटकांची पावलं आपसुकच निसर्गाकडे वळतात... पण, यंदा मात्र पर्यटकांना काही ठिकाणी जाता येणार नाही. पश्चिम घाटांतर्गत येणाऱ्या ताम्हिणी, सुधागड आणि अंधारबन या भागात वनविभागानं पर्यटकांना बंदी घातलीय. घाटावरच्या जैवविविधतेचं रक्षण करण्यासाठी हा निर्णय घेतला गेल्याचं वनविभागाकडून सांगण्यात येतंय. 

ताम्हिणी, सुधागड आणि अंधारबन ही तिनही ठिकाणी अतिसंवेदनशील म्हणून ओळखले जातात. या भागांचा अनुभव घेणं, हा पर्यटकांसाठी एक सुखद अनुभव असतो. परंतु, काही बेजबाबदार पर्यटकांमुळे इथल्या जैवविविधतेला मात्र धोका निर्माण झालाय. अशा ठिकाणी जाऊन कचरा करणं, पर्यावरणाची काळजी न घेणं अशा स्वैराचारामुळे वनविभागानं हा निर्णय घेतलाय. या परिसरात बेतालपणे वर्तन करणाऱ्या पर्यटकांवर कडक कारवाई करणार असल्याचंही अधिकाऱ्यांनी म्हटलंय. 

पुण्यापासून ७० कि.मी अंतरावर कोलाड आणि मुळशी धरणाच्या मधल्या भागात ताम्हिणी घाट आहे. ३ मे २०१३ रोजी ४९.६२ चौ.कि.मीचं हे क्षेत्रफळ असलेल्या या भागाची 'अभयारण्य' म्हणून घोषणा करण्यात आली. प्रामुख्याने पुणे आणि अंशत: रायगड जिल्ह्य़ातील  अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आलं. शेकरू, पिसोरी, भेकर, सांबर, खवल्या मांजर, उदमांजर, जावडी मांजर, वाघाटी, बिबटय़ा, रानमांजर, साळींदर रानडुक्कर आणि वानर हे वन्यजीव इथं आढळतात... तर अंधारबन काजवा महोत्सवासाठी पर्याटकांत परिचित आहे. 

त्यामुळे सुट्टीच्या दिवसांत इथं पर्यटकांची रिघ लागते, ती आता बंद होणार आहे. वनविभागाच्या या निर्णयामुळे पर्यटकांची निराशा होणार असली तरी निसर्गप्रेमी मात्र या निर्णयामुळे खुश आहेत.