नंदूरबार : नंदूरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा ग्रामपंचायतीचा निवडणूक प्रचार सध्या सुरू आहे, मात्र यात प्रशासनाकडून दुर्लक्ष झाल्याने निवडणूक एक गंमत झाली आहे.
कारण येथील प्रभाग क्रमांक ४ मध्ये ६ उमेदवार आहेत आणि मतदार आहेत शून्य, त्यामुळे मतदान कोण करणार आणि निवडून कोण येणार हा प्रश्न उपस्थित झाला आहे.
या ठिकाणी ७ ऑक्टोबर रोजी मतदान आहे. आता काय करायचे याबाबतीत निवडणूक आयोगाकडून मार्गदर्शन करावे, अशी मागणी संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांनी केली आहे.
या मतदार संघ जामिया महाविद्यालय परिसरातील आहे, येथे मोठ्या प्रमाणात विद्यार्थी आणि कर्मचारी राहतात, त्यांची नाव जनगणनेत असली, तरी विद्यार्थ्यांची नावं ही मतदार यादीत, त्यांच्या मूळगावी आहेत.
विशेष म्हणजे याबाबतीत हरकत देखील योग्यवेळी घेण्यात आली होती, मात्र प्रशासनानेच दुर्लक्ष केलं असा आरोप, आमश्या पाडवी, शिवसेना जिल्हा प्रमुख यांनी केला आहे.
एकंदरीत निवडणूक आयोग ग्रामपंचायत निवडणुकीच्या बाबतीत सक्रीय नाही. तक्रारींकडेही मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष होत असल्याचं दिसून येत आहे, त्यामुळे अक्कलकुवा गावची ग्रामपंचायत निवडणूक रद्द करण्याची नामुष्की निवडणूक आयोगावर येण्याची शक्यता वाढली आहे.