नोटबंदीचा मोठा फटका, सांगलीसह ८ जिल्हा बँकांचे ११२ कोटी बुडीत

 सांगलीसह ८ जिल्हा बँकांकडील ११२ कोटी रुपये बुडीत गेले आहे. त्यामुळे बॅंक क्षेत्रात मोठी खळबळ उडालेय. 

Updated: Feb 13, 2018, 11:28 AM IST
नोटबंदीचा मोठा  फटका, सांगलीसह ८ जिल्हा बँकांचे ११२ कोटी बुडीत title=

सांगली : सांगलीसह ८ जिल्हा बँकांकडील ११२ कोटी रुपये बुडीत गेले आहे. त्यामुळे बॅंक क्षेत्रात मोठी खळबळ उडालेय. नोटबंदीनंतर हजार आणि पाचशेच्या रद्द नोटांची शिल्लक रक्कम धुळ खात पडली होती. मात्र, ही रक्कमही ‘आरबीआय’ने स्वीकारावी यासाठी जिल्हा बँकांचे प्रयत्न सुरू होते, मात्र नाबार्डने बँकांना पत्र पाठवून ही रक्कम बँकांनी लॉस अ‍ॅसेट दाखवून त्याची तरतूद करावी, असे नमूद केले, त्यामुळे बँकांचा आर्थिक डोलारा कोलमडा आहे.

या आहेत ८ बॅंका

सांगली, कोल्हापूर, पुणे, अहमदनगर, नाशिक, वर्धा, अमरावती, नागपूर या आठ जिल्हा बँकांकडील पाचशे, हजार रुपयांच्या रद्द नोटांचे शिल्लक ११२  कोटी रुपये आरबीआय, नाबार्डने बुडीत (लॉस असेट) ठरविले आहेत. ही रक्कम लॉस असेट दाखवून वैधानिक लेखापरीक्षक यांच्या सल्ल्यानुसार ताळेबंदात ‘एनपीए’ तरतूद करावी, असे नाबार्डने कळविले आहे. त्यामुळे या बँकांना त्यांचा पैसा परत  मिळण्याची आशा मावळलेय. या बँकांच्या अध्यक्ष, सीईओंची मंगळवारी पुण्यात बैठक होणार आहे. 

सर्वोच्च न्यायालयात जाणार

दरम्यान, या नोटा स्वीकारण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली जाणार आहे. ८ नोव्हेंबर २०१६ रोजीच्या आणि त्या पूर्वीच्या जिल्हा बँकेत शिल्लक पाचशे, हजाराच्या नोटांचे ११२ कोटी रुपये ‘आरबीआय’ने स्वीकारले नाहीत. ही रक्कम जिल्हा बँकेत पडून आहे. 

नोटा स्वीकारण्यास मनाई

केंद्र शासनाने  ८ नोव्हेंबर २०१६ रोजी पाचशे व एक हजार रुपयांच्या नोटा चलनातून रद्द केल्या.  ९ नोव्हेंबर रोजी देशभरातील सर्व बँका बंद ठेवण्याचे आदेश होते. १० नोव्हेंबरपासून बँकांचे कामकाज सुरू झाले. पाचशे, हजार रुपयांच्या नोटा स्वीकारण्यास बँकांना मान्यता देण्यात आली. जिल्हा बँकांना चार दिवसांनी म्हणजे १४ नोव्हेंबर रोजी पाचशे, हजार रुपयांच्या नोटा स्वीकारण्यास मनाई करण्यात आली होती.  

जिल्हा बँकांनी १० ते १३ नोव्हेंबर या चार दिवसांच्या कालावधीत पाचशे, हजाराच्या नोटा स्वीकारल्या होत्या. महाराष्ट्रात जिल्हा बँकाकडे २ हजार ७७१ कोटीच्या जुन्या नोटा पडून होत्या. ही रक्कम स्विकारावी यासाठी जिल्हा बँकांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार ‘आरबीआय’ने या नोटांची रक्कम स्विकारण्यास सहमती दर्शवली.  त्यानुसार ‘आरबीआय’ने   २९ जून २०१७ रोजी अधिसूचना काढली. 

कोट्यवधी रक्कम बँकेत पडून 

 १० ते १३ नोव्हेंबर या  कालावधीत जमा झालेल्याच नोटा स्वीकारण्याची अट त्यामध्ये घातली. त्यानुसार सांगली जिल्हा बँकेकडील ३०१.०८ कोटी रुपये  ११ जुलै २०१७ रोजी ‘आरबीआय’ने स्वीकारले; परंतु ८ नोव्हेंबर २०१६ रोजीच्या व त्या पूर्वीच्या जिल्हा बँकेत शिल्लक पाचशे, हजाराच्या नोटांचे १४.७२ कोटी रुपये ‘आरबीआय’ने स्वीकारले नाहीत. ही रक्कम जिल्हा बँकेत पडून आहे. 

'शेतकऱ्यांना कर्ज माफीचा लाभ द्या'

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी  सन्मान योजनेंतर्गत ‘ओटीएस’साठी पात्र शेतकऱ्यांचे दीड लाखावरील रकमेचे पाच वर्षाच्या मध्यम मुदत कर्जात पुर्नगठन करावे व या शेतकऱ्यांचे दीड लाखांपर्यंतच्या कर्ज माफीचा लाभ द्यावा, अशी मागणीही जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष संग्रामसिंह देशमुख व मुख्य कार्यकारी अधिकारी प्रतापसिंह चव्हाण यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली. जिल्ह्यात ६५४३ शेतकरी ‘ओटीएस’साठी पात्र आहेत. या शेतकऱ्यांना ३९.८१ कोटी रुपयांचा लाभ होणार आहे.  

जिल्हा बँक आणि बुडीत रक्कम

सांगली  -   14.72 कोटी 
कोल्हापूर -   25.28 कोटी
पुणे -       22.25 कोटी
अहमदनगर - 11.60 कोटी
वर्धा -      00.79 कोटी
नागपूर- 05.03 कोटी
अमरावती-  11.05 कोटी
नाशिक-  21.32 कोटी 
एकूण-    112.04 कोटी