झटपट लोन App चं 'चायना कनेक्शन', तपासात धक्कादायक खुलासा

फसवणूकीच्या तक्रारी वाढल्यानंतर रिझर्व्ह बँकेचं ग्राहकांना आवाहन

Updated: Dec 28, 2020, 04:49 PM IST
झटपट लोन App चं 'चायना कनेक्शन', तपासात धक्कादायक खुलासा  title=

विशाल करोळे, औरंगाबाद : झटपट कर्ज देणा-या अनेक कंपन्या लोन देण्याच्या नावाखाली ग्राहकांचा छळ करीत आहे, मात्र हा प्रकार यापुढंही जात आंतरराष्ट्रीय गुन्हेगारीशी संबंधीत असल्याचा धक्कादायक खुलासा आता झाला आहे,  झटपट लोन अँप तुमच्या मोबाईलवरून डेटा चोरतात आणि थेट चिनला पुरवठा करतात असला हा प्रकार आहे, पाहूयात..

चोरलेला डेटा थेट चिनी ठकसेनांच्या हाती

झटपट कर्ज देणारी अनेक मोबाईल अॅप आहेत. या अॅपवरून तुम्ही कर्ज घेतलंत, तर परतफेडीसाठी तुमचा मानसिक छळ केला जातो. काही प्रकरणांमध्ये तर महिलांना बलात्काराची धमकी देण्यापर्यंत मजल गेलीये. शिवाय कर्ज देण्याच्या नावाखाली मोबाईलमधील तुमची माहितीही चोरली जाते. आता ही चोरलेली माहिती थेट चीनमध्ये पोहोचवली जात असल्याची धक्कादायक बाब उघड झालीये. बंगळुरू पोलिसांच्या सायबर क्राईम शाखानं एका प्रकरणाशी संबंधित चार कंपन्यांवर छापे टाकले. यातील तीन कंपन्यांचे संचालक चिनी असल्याचं समोर आलंय. दोन चिनी नागरिकांना अटकही झालीये. 

या प्रकरानंतर बंगळूरु पोलिस आणि तेलंगणा पोलिसांनी असले 158 अँप ब्लॉक करण्यात यावे असे पत्र गुगलला लिहले आहे, यातून मोठ्या प्रमाणात फसवणूक सुरु आहे त्यामुळं  तातडीने हे अँप हटवण्यात यावे असं पोलिसांनी गुगलला कळवले आहे, तर कंपन्यांविरोधात पोलिसांनी कारवाई जोरात सुरु केली आहे.

फसवणूकीच्या तक्रारी वाढल्यानंतर रिझर्व्ह बँकेनंही इशारा दिलाय. अँपवरून मिळणाऱ्या झटपट कर्जाच्या मोहात फसू नका, असं आवाहन आरबीआयनं केलंय. 

अॅपवर केवळ आधारकार्डच्या आधारे कर्ज मिळत असल्यानं अनेक तरूण मोहात पडतात. याचा फायदा कंपन्या आणि ठकसेन उचलतात.. त्यातून अनेकांचा मानसिक छळ होतो. आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. एकट्या औरंगाबादमध्ये 100च्या वर तरूण बळी पडलेत. त्यामुळे झटपट कर्जाची हमी म्हणजे जीवाला धोका हाच मुलमंत्र लक्षात ठेवलेला बरा.