कांद्याला 110 रूपये किलोचा बाजारभाव, शेतकरी झाला लखपती

कांदा आता शेतकऱ्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू आणत आहे. 

Updated: Dec 2, 2019, 03:36 PM IST
कांद्याला 110 रूपये किलोचा बाजारभाव, शेतकरी झाला लखपती

हेमंत चापुडे, झी मिडीया, पुणे : दुष्काळ आणि परतीचा पाऊस यामुळे उभी कांद्याची पीक पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले होते. मात्र हाच कांदा आता शेतकऱ्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू आणत आहे. शिरूर तालुक्यातील तांदळी गावाचे शेतकरी मुक्ताजी गदादे या शेतकऱ्याच्या 23 पिशवी कांद्याचे 1 लाख रुपये मिळाल्याने सध्या हा शेतकरी लखपती झाला आहे. गदादे यांनी आपला कांदा सोलापूर येथील बाजार समितीत पाठवला होता तेथे त्यांच्या कांद्याला किलोला 110 रूपये बाजारभाव मिळाल्याने गदादे अवघ्या 23 पिशव्यांत लखपती झाले आहेत. 

पुणे जिल्ह्यात रब्बी हंगामात कांद्याची लागवड केली जाते कांदा या पिकाला मोठा भांडवली खर्चही करावा लागतो मात्र कांदा काढणीच्या वेळी कांद्याला योग्य बाजारभाव मिळत नाही.त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा तोटा सहन करावा लागतो आणि शेतकरी कर्जबाजारी होतो आणि हाच शेतकरी आता कर्जबाजारी होत चाललाय तर दुसरीकडे साठवणुकीत ठेवलेल्या खांद्यातून काही शेतकरी लखपती होत चाललेत.मात्र पुढील काळात शेतमालाल हमीभाव दिला पाहिजे अशी मागणी शेतकरी करत आहेत.

राज्यात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. शेतात काबाडकष्ट करून शेतातील शेतमालाला योग्य बाजारभाव मिळत नसल्याने नेहमीच शेतकरी तोट्यात जातो. त्यामुळे शेतकऱ्याची कर्जमाफी करून हा प्रश्न सुटणार नाही तर शेतमालाला हमी भाव दिला तर शेतकरी कायमस्वरूपी उभा राहील असेही शेतकरी सांगतात.

गेल्या अनेक दिवसांपासून शेतात काबाडकष्ट करणारा कष्टकरी बळीराजा हा शेतमालाला बाजारभाव मिळत नसल्याने कर्जबाजारी होत चालला होता, त्यातून दुष्काळी संकट व परतीच्या पावसाने उभी पिके पाण्याखाली गेली.त्यामुळे मोठ्या भांडवली खर्चातून उभा केलेला शेतमाल पाण्यात गेल्यामुळे या शेतकर्‍यांवर मोठा कर्जाचा बोजा उभा राहिला मात्र सध्या कांद्याला सोन्याचे भाव आल्याने हा कांदा आता शेतकर्‍यांना लखपती बनवत आहे.

त्यामुळे शेतमाला योग्य बाजार मिळाला नाही तर आज दिलेली कर्जमाफी उद्या पुन्हा हा शेतकरी कर्जबाजारी होणार आहे त्यामुळे या शेतकऱ्यांचा आवाज ऐकून ठाकरे सरकार पुढील काळात काय भूमिका घेतात याकडे शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत.