close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

जिल्हा परिषदेची डिजिटल शाळा, स्मार्ट टीव्हीवर शिक्षणाचे धडे

जिल्हा परिषदची शाळा म्हटले की नाक मुरडले जाते. मात्र, जिथे विद्यार्थ्यांना सुट्टीच्या दिवशीही या शाळेत यावेसे वाटते.  

Updated: Jun 23, 2019, 03:33 PM IST
 जिल्हा परिषदेची डिजिटल शाळा, स्मार्ट टीव्हीवर शिक्षणाचे धडे

मुस्तान मिर्झा, उस्मानाबाद : जिल्हा परिषदची शाळा म्हटले की नाक मुरडले जाते. मात्र, जिथे विद्यार्थ्यांना सुट्टीच्या दिवशीही या शाळेत यावेसे वाटते. उस्मानाबाद जिल्ह्यातील भाटशिरपुरा या छोट्याश्या गावात शिक्षकांच्या पुढाकाराने आणि ग्रामस्थांच्या मदतीने जिल्हा परिषद शाळा डिजिटल करण्यात आली आहे. खासगी शाळांच्या तोडीस ही शाळा बनवण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या या डिजिटल शाळेत स्मार्ट टीव्हीवर शिक्षण देण्यात येत आहे. विद्यार्थ्यीही आनंदाने शिक्षण घेताना दिसतात.

शाळा जिल्हाभरात नावारूपास

राज्यातील जिल्हा परिषद शाळा या कात टाकत असल्याचं चित्र आहे. खासगी शाळा आणि सध्या भरमसाठ फी घेणाऱ्या इंग्रजी शाळा सुरू झाल्या आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद शाळांच्या पटसंख्येत घट होत आहे. शिवाय जिल्हा परिषदेचे शिक्षक आपल्या शाळेची गुणवत्ता टिकवण्यामध्ये ही अपयशी ठरत आहेत. मात्र उस्मानाबाद जिल्ह्यातील भाटशिरपुरा गावातील जिल्हा परिषद शाळा ही आदर्श जि.प शाळा म्हणून जिल्हाभरात नावारूपास येत आहे.

शाळा कौतुकाच विषय

भाटशिरपुरा या गावातील जिल्हा परिषद शाळा कौतुकाच विषय बनण्याचं कारण ही तसच आहे. आपण या शाळेच्या परिसरात प्रवेश केला तर आपल्याला वाटणार ही नाही की आपण डबघाईला आलेल्या जिल्हा परिषद शाळेत प्रवेश करतोय. कारण प्रवेश करताच अरसीसी बांधकाम केलेलं एक मोठं प्रवेश द्वार, विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी प्रशस्त मैदान. मैदानात घसरगुंडी, खो-खो, कबड्डीच मैदान, सांस्कृतिक कार्यक्रमासाठी सुंदर असं बालकमंच तुमचं लक्ष वेधून घेत.

शालेय धडे हे विद्यार्थ्यांच्या मनात रुजावे म्हणून

शाळेत प्रवेश करताच प्रांगणात पेव्हर ब्लॉक, भिंतीवर सुंदर अशे चित्र, प्रांगणात महागडे टाईल्स. भिंतीवर महापुरुषांचे कार्य, गणिताचे पाठ, मराठी-इंग्रजी महिने, इंग्रजी बाराखळी, टीव्हीवर पाहतात ते कार्टून्स, शालेय धडे हे विद्यार्थ्यांच्या मनात रुजावे म्हणून गिरवले गेले आहेत. बाहेरून कुठून ही वाटत नाही की ही जिल्हा परिषद शाळा आहे. खासगी शाळेत भरमसाठ फी घेऊन ही इतक्या साऱ्या सुविधा दिल्या जात नाही तितक्या सरकारी शाळेत आहेत.

स्मार्ट टीव्हीवर शिक्षणाचे धडे

इतकच नव्हे तर वर्गात प्रवेश केला तर आपण कुठे आलो असाच भास होतो. त्याच कारण म्हणजे इथले शिक्षक बोर्डावर कमी आणि स्मार्ट टीव्हीवर जास्त शिकवतात. वर्गात ४३ इंची स्मार्ट एलईडी टीव्ही, सर्वांना आवाज जाईल असे स्पीकर, प्रयोगाचे साहित्य, काही बोर्ड आहेत ते विद्यार्थ्यांना सुचेल ते लिहायला. त्यांच्या कलेला आणि बुद्धीला वाव देण्यासाठी. ही चिमकुली स्मार्ट टीव्हीवर दिसणाऱ्या चित्रात रंगून जातात. शिवाय शिक्षक ही शिकवताना उत्साही दिसतात. अगदी नृत्य करून मुलांना कविता शिकवतात. मुलही त्यात रमून जातात.

शाळा परिसरात परसबाग

बाहेरील परिसरात या शाळेच्या शिक्षकांनी परसबाग तयार केली आहे. या परसबागेत सेंद्रिय पद्धतीने पालेभाज्या पिकवल्या जातात आणि त्याच भाज्या मुलांना शालेय पोषण आहारामध्ये दिले जातात. मुलंही मोठ्या चवीने पालेभाज्या खातात. जेवण झालं की पिण्यासाठी आणि हात धुण्यासाठी हँडवॉश स्टेशन. मुलांच्या चपला ठेवण्यासाठी स्वतंत्र चप्पल स्टँड. त्यामुळे मुलांना शाळेत येण्याची गोडी लागते. शिवाय यंदा शाळा सुरू झाली तेव्हा या शाळेच्या शिक्षकांनी नवीन आलेल्या चिमुकल्यांचा स्वागत रथमध्ये बसवून केलं.

लोकसहभागातून मोठा हातभार

इतकं सगळं साध्य झाल ते म्हणजे लोकसहभागातून आणि शिक्षकांच्या पुढाकाराने. लोकसहभागातून या शाळेला तब्बल ७ लाखांची मदत मिळाली. शिवाय यशाळेतील शिक्षक दरवर्षी विद्यार्थ्यांसाठी १० हजार रुपये खर्च करतात. या शाळेच्या मुख्यध्यापकांनी आपल्या मुलीच्या लग्नाच्या लग्न पत्रिकेत आहेर रोख स्वरूपात स्वीकारला जाईल, ही रक्कम जिल्हा परिषद शाळा डिजिटल करण्यासाठी मदत म्हणून दिली जाणार आहे, अस ठळक अक्षरात लिहले होतं. म्हणून पाहुणे मंडळींनी ही तब्बल ५० हजार रुपये देणगी दिली. 

शाळेला 'अ' मानांकन

फक्त डिजिटल करून हे शिक्षक थांबले नाहीत तर विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर ही भर देत आहेत. दरवर्षी या शाळेतील विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र होत आहेत. शिवाय इतर अॅक्टिव्हिटीमध्ये ही मुलं चमकदार कामगिरी करत आहेत. म्हणून या शाळेला 'अ' मानांकन ही देण्यात आलं आहे. प्रत्येक जिल्हापरिषद शाळेच्या शिक्षकांनी आणि जिल्हापरिषदेतील अधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला तर जिल्हापरिषद शाळांच रुपडं पालटल्या शिवाय राहणार नाही.