कोरेगाव भीमा हिंसाचार बाहेरच्यांनी घडवला- शरद पवार

 पवारांनी केंद्र आणि राज्य सरकारवरही ताशेरे ओढले आहेत. अकलूजमध्ये झालेल्या कार्यक्रमात पवार बोलत होते.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Jan 7, 2018, 09:44 PM IST
कोरेगाव भीमा हिंसाचार बाहेरच्यांनी घडवला- शरद पवार title=

सोलापूर : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी, कोरेगाव भीमा  हिंसाचार प्रकरण हे, बाहेरच्या लोकांनी घडवले, त्या बाहेरच्या लोकांना सरकारने शोधावे आणि त्यांना कठोरातली कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी  केली आहे. 

शरद पवारांनी केंद्र आणि राज्य सरकारवरही ताशेरे ओढले आहेत. अकलूजमध्ये झालेल्या कार्यक्रमात पवार बोलत होते.

भिडेंचं नाव न घेता पवार म्हणाले...

पिकवणारा जगला तर खाणारा जगेल ही गोष्ट सरकारने लक्षात घेतली पाहिजे, असेही शरद पवारांनी म्हटले आहे. काही लोकांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर टीका केली होती. 

४०-४० टन उस उत्पादकांना कर्जमाफी हवी? असा प्रश्न विचारला होता. मात्र शेतकऱ्याची अवस्था खरंच वाईट आहे, हे त्यांना ठाऊक नसावे, असा टोला शरद पवारांनी संभाजी भिडे गुरुजींचे नाव न घेता लगावला.

धोरण बदलण्याची गरज

सरकारने आता त्यांचे धोरण बदलण्याची गरज आहे.  राज्यातील शेतकऱ्यांची अवस्था आणि व्यथाही शरद पवारांनी त्यांच्या भाषणात मांडली. आम्ही पिकवणाऱ्यांचा विचार करतो आणि सरकार खाणाऱ्यांचा विचार करते आहे, असंही पवार यावेळी म्हणाले.

शेतीकडे सपशेल दुर्लक्ष

शेतीकडे सपशेल दुर्लक्ष करण्याचे धोरण या गोष्टीसाठी कारणीभूत आहे. सांख्यिकी विभागाने दिलेल्या माहितीनुसार, या वर्षी देशाचा विकास दर घसरण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे शेती विकास दर घसरण्याचाही अंदाज व्यक्त झाला आहे, असाही आरोप यावेळी शरद पवारांनी केला.

शेतकऱ्याचे कर्जमाफ करताना पोटात दुखते

बँकांची वित्तीय तूट भरून काढण्यासाठी केंद्र सरकारने ८० हजार कोटी रूपये भरले, पण शेतकऱ्यांना कर्जमाफी देताना, त्याच्या डोक्यावरचे कर्जाचे ओझे कमी करताना या सरकारच्या पोटात दुखते. 

नवीन करप्रणाली आणि नोटाबंदी या दोन्ही निर्णयांमुळे देशाची आर्थिक अवस्था बिकट आहे असेही मत शरद पवारांनी यावेळी व्यक्त केले.

भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरण

कोरेगाव भीमाच्या ऐतिहासिक लढाईच्या विजयाला 200 वर्ष पूर्ण झाली आहेत. इंग्रजांकडून लढताना महार सैनिकांनी, पेशवाईचा या लढाईत दारूण पराभव केला होता. 

सुमारे 25 हजारापेक्षा जास्त पेशव्यांच्या सैन्याला, 800 महार सैनिकांनी  हरवले होते. हे युद्ध 1 जानेवारी 1818 रोजी कोरेगाव भीमा येथे झाल्याचं सांगण्यात येतं. 

या युद्धाला 200 वर्ष पूर्ण झाली, या निमित्ताने 1 जानेवारी 2018 रोजी, राज्यातील दलित मोठ्या प्रमाणात भीमा कोरेगावला उपस्थित होते, यावेळी काही दलित कार्यकर्त्यांवर दगड फेक झाली. याविरोधात राज्यातील दलित संघटनांनी कडकडीत बंद पाळला.