सोशल मीडियावर 'मायबोली'ची चलती!

इंग्रजीत संदेश पाठवण्यापेक्षा आपल्या भाषेत एखादी गोष्ट सांगणं अधिक सोपं असल्याचं तरुण सांगतात

Updated: Dec 27, 2019, 04:26 PM IST
सोशल मीडियावर 'मायबोली'ची चलती!  title=

किरण ताजणे, झी २४ तास, नाशिक : सोशल मीडियावर सुरुवातीला फक्त इंग्रजी भाषेचा वापर केला जात होता. मात्र, आता मातृभाषा मराठीचा वापर करण्याचं प्रमाणं वाढलंय. गेल्या वर्षभरात वेगवेगळ्या विषयावरच्या सात कोटी मराठी भाषेतील संदेश सोशल मीडिवर अपलोड केले गेले. सोशल मीडिया अस्तित्वात आल्यानंतर इंग्रजी ही एकमात्र लिपी संवाद माध्यम होती. सगळे संदेश हे इंग्रजीतूनच एकमेकांना पाठवले जात होते. पण आता काळ बदललाय. आता आपल्या मायबोलीतून संदेश पाठवण्याचं प्रमाण वाढलंय. 

इंग्रजीपेक्षा मराठी, हिंदी, गुजराती, तेलगु, तमिळ भाषेत संदेश तयार केले जात आहेत किंवा एकमेकांशी संवाद साधण्यासाठीही स्थानिक भाषेचाच वापर केला जातोय. इंग्रजी लिहता, वाचता येणारी मंडळीही त्यांच्या त्यांच्या मातृभाषेचा संवादासाठी माध्यम म्हणून वापर करत आहेत. सरत्या वर्षात जवळपास ७ कोटी मॅसेज देशी भाषेत अपलोड केले गेले. महाराष्ट्रापुरता विचार केला तर महाराष्ट्रातील कोल्हापूरचा पूर, मुख्यमंत्रिपदासाठीचा सत्तासंघर्ष, आषाढी एकादशी, पुलवामा दहशतवादी हल्ला, अयोध्या निकाल यावर मराठी भाषेत लिहलेले संदेश एकमेकांना पाठवण्यात आले.

तरुणाईलाही मराठी भाषेत संवाद साधणं आवडू लागलंय. इंग्रजीत संदेश पाठवण्यापेक्षा आपल्या भाषेत एखादी गोष्ट सांगणं अधिक सोपं असल्याचं तरुण सांगतात.

सोशल मीडियामुळे लिखाणसंस्कृती धोक्यात येईल. मराठी भाषा संपून जाईल असं वाटलं होतं. पण सोशल मीडियात मराठी भाषेचा वापर वाढू लागलाय. मराठी संपण्याऐवजी मराठी भाषा आणखीनच समृद्ध होत चाललीय असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही.