प्रताप नाईकसह अमर काणे, झी मीडिया, मुंबई : जम्मू काश्मीरमध्ये (Jammu Kashmir) पाकिस्तानने सीमेवर केलेल्या गोळीबारात शुक्रवारी महाराष्ट्रातील दोन जवान शहीद (jawans martyred) झाले. कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा इथले ऋषिकेश जोंधळे आणि नागपूरच्या काटोलमधील भूषण सतई या दोन जवानांना हौतात्म्य आलं.
पाकिस्तानच्या (Pakistan) गोळीबारात महाराष्ट्राच्या दोन सुपुत्रांना वीरमरण प्राप्त झालंय. कोल्हापूरचे जवान ऋषीकेश जोंधळे आणि काटोलचे रहिवासी असलेले भूषण सतई यांना जम्मू काश्मीरमध्ये पाकिस्तानशी लढताना वीरमरण आलंय. ऋषिकेश जोंधळे हे पूंछ जिल्ह्यातल्या सावजीयानमध्ये तैनात होते. पाकिस्तानच्या गोळीबारात जोंधळे जखमी झाले. त्यांना पुढील उपचारांसाठी सैनिकी हॉस्पिटलमध्ये नेण्यात येत असतानाच त्यांना हौतात्म्य आलं. अवघ्या विसाव्या वर्षी या तरूणाने भारत मातेसाठी आपला देह ठेवला. जोंधळे यांच्या मागे त्यांचे आई वडील आणि धाकटी बहीण असा परिवार आहे.
ऋषीकेश जोंधळे हे १६ डिसेंबर २०१८ मध्ये मराठा लाईफ इन्फ्रट्रीमध्ये शिपाई म्हणून भरती झाले होते. ऋषीकेश हे राष्ट्रीय खेळाडू होते. ११ नोव्हेंबरला म्हणजेच ३ दिवसांपूर्वी ऋषीकेश यांनी घरी आई वडिलांशी संपर्क साधला होता. तोच त्यांचा अखेरचा फोनकॉल ठरला.
जोंधळे यांच्या बहिरेवाडी या गावावर शोककळा पसरली आहे. याच गावाचे सुपुत्र प्रवीण यलकर हे ही २०१७मध्ये जम्मू काश्मीरमध्ये धारातीर्थी पडले होते.
नागपूर जिल्ह्याच्या काटोल तालुक्यातील "अंबाडा सोनक" गावाचे रहिवासी असलेले भूषण रमेशराव सतई यांनाही पाकिस्तानच्या गोळीबारात हौतात्म्य आलंय. सतई हे गुरेझ सेक्टरमध्ये कंझलवान भागात तैनात होते. वयाच्या अवघ्या २८ व्या वर्षी त्यांनी भारतमातेसाठी देह ठेवला.
नाईक भूषण सतई हे मराठा लाईट इन्फन्ट्रीच्या ६ मराठा या बटालियनमध्ये कार्यरत होते. गेल्यावर्षापासून त्यांची पोस्टिंग जम्मू काश्मीरमध्ये होती. भूषण यांच्या पश्चात आई, वडील, एक बहीण, एक भाऊ आहेत. भूषण यांच्या घरात सध्या त्यांच्या बहिणीच्या लग्नाची तयारी सुरू होती.
भारतमातेच्या या सुपुत्रांनी पाकिस्तानच्या नापाक हरकतींना प्रत्युत्तर देत धारातीर्थी देह ठेवला. हा देश त्यांचं बलिदान कधीच विसरणार नाही. पाकिस्तानची कायमची खोड मोडणं हीच या शहीदांना खरी श्रद्धांजली ठरेल.