मुकुल कुलकर्णी, झी मिडिया नाशिक : दामदुप्पट परताव्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांना फसवणूक केल्याचा आणखी एक घोटाळा नाशिकमध्ये उघडकीस आलाय. पॅनकार्ड क्लब कंपनीच्या माध्यमातून विविध योजनांच्या नावाखाली शेकडो गुंतवणूकदरांना गंडा घालण्यात आलाय. केबीसी पासून सुरु झालेली ही घोटाळ्याची मालिका अद्यापही थांबायला तयार नाहीये.
पॅनकार्ड क्लब कंपनीचे देशभरात पन्नासहून अधिक रिसोर्ट आहेत. त्यात केलेल्या गुंतवणुकीच्या माध्यमातून ठेवीदारांना एक दिवसाचा स्टे फ्री मिळतो. ५० हजार गुंतवल्यावर दोन अडीच वर्षांनी ७५ हजार रुपये मिळतील अशा वेगवेगळ्या योजना कंपनीच्या माध्यमातून लागू करण्यात आल्या, आणि एका पाठोपाठ एक राज्यभरातून हजारोंच्या संख्येनं ठेवीदार त्यांच्या जाळ्यात ओढले गेलेत.
नाशिकच्या पंचवटी परिसरात या कंपनीनं मोठं कार्यालय थाटलं होतं. कार्यालयातील थाट पाहून हजारो नागरिकांनी आपली जमापूंजी यात गुंतवली. मात्र अचानक कार्यालयाला कुलूप लागलं. कंपनीचे कर्मचारी फरार झाले आणि एजंट लपू लागले.
ठेवीदारांनी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. एप्रिल मे महिन्यात मोर्चा काढून लोकप्रतिनिधी आणि पोलीस प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला मात्र अजूनही कंपनीचे संचालक मोकाट फिरताहेत.
नाशिकमध्ये आजवर केबीसी, इमू, मैत्रेय, हाउस ऑफ इन्वेस्टमेंट नावाने हजारो गुंतवणूकदारांची शेकडो कोटी रुपयांना फसवणूक झालीय. त्यातील फक्त मैत्रेय फसवणुकीतल्या काही गुंतवणुकदारांना सुरवातीच्या काळात पैशांचा परतावा करण्यात आला. मात्र आता ते कामही ठप्प झाल्याने आर्थिक फसवणुकीच्या या गुन्ह्यांना चाप बसत नाहीये.