आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांसाठी मोठी बातमी

लसीचे 2 डोस अन् विठुरायाची भेट, वारीला पंढरपुरात जाण्याआधी वाचा महत्त्वाची ही अपडेट

Updated: Jun 14, 2021, 11:03 AM IST
आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांसाठी मोठी बातमी title=

सचिन कसबे झी मीडिया पंढरपूर: वारीला जाण्याआधी आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांसाठी मोठी अप़डेट येत आहे. विठुरायाच्या भेटीआधी वारकऱ्यांना शक्तीचा डोस घ्यावा लागणार आहे. विठुरायाचरणी जाण्याआधी पंढरपुरात नगराध्यक्षांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोठी मागणी केली आहे. आषाढी एकादशीसाठी पंढरीला जाण्यासाठी शासनाने नियमावली जाहीर केली असली तरी वारकरी पायी वारीचा आग्रह धरत आहेत. 

कोरोनाचा संसर्ग आता कुठे हळूहळू आटोक्यात येत असताना पुन्हा हा उद्रेक होऊ नये यासाठी प्रयत्न सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर आषाढी वारीनिमित्ताने नगराध्यक्षांनी प्रशासनाकडे मोठी मागणी केली. पंढरपूरच्या नगराध्यक्षा साधनाताई भोसले यांनी लसीचे 2 डोस झालेल्या वारकऱ्यांना पंढरपुरात प्रवेश देण्याची मागणी केली.

कोरोनाच्या संसर्गामुळे गेल्या वर्षी आषाढी वारी रद्द झाल्यानंतर यंदाही या वारीवर कोरोनाच सावट आहे. पालखी मार्गावरील सगळ्यात शेवटचं गाव असलेल्या वाखरी ग्रामपंचायतीने पायीवारी काढण्यास विरोध केलेला आहे.

पंढरपूरच्या नगराध्यक्ष साधनाताई भोसले यांनी शासनाकडे लसीचे 2 डोस पूर्ण झालेल्या वारकऱ्यांना पंढरपुरात प्रवेश देण्याची मागणी केली. ज्या वारकऱ्यांचे कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस पूर्ण झालेले आहेत. अशाच वारकऱ्यांना प्रवेश द्यावा असंही त्यांनी म्हटलं आहे.

पंढरपुरात आतापर्यंत 24 हजार 731 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला. तर सध्या 555 जणांवर कोरोनाचे उपचार सुरू आहेत. ४८० जणांनी जीव गमावला आहे. यामुळे अद्यापही नागरिकात कोरोनाबद्दल भीती आहे. पंढरपुरात यंदा 6 दिवस पालख्यांचा मुक्काम असणार आहे. त्यामुळे भाविक दर्शनासाठी येताना गर्दी करतील. त्याच पार्श्वभूमीवर नगराध्यक्षांनी ही मागणी केली आहे.