बारामती: तुकोबारायांच्या पालखीत मेढ्यांचे पहिले गोल रिंगण बारामती तालुक्यातल्या काटेवाडीत पार पडले. टाळ मृदुंगाच्या गजरात आणि माऊली-तुकोबांच्या जयघोषात मोठ्या भक्तीमय वातावरणात हा सोहळा पार पडला.
तुकोबांची पालखी काटेवाडीत दाखल होताच परंपरेनुसार परीट समाजाने पालखीचे धोतराच्या पायघड्या घालून स्वागत केले. संत गाडगेबाबांच्या शिकवणुकीतून ही परंपरा सुरू झाल्याचे सांगण्यात येते. काटेवाडी परिसरातील भाविकांनी काटेवाडी बस स्थानकाजवळ पालखीचे स्वागत केल्यानंतर गावातील मैदानावर पालखी नेण्यात आली. या वेळी पालखीभोवती वारकऱ्यांनी रिंगण केले. डोळ्यांचे पारणे फेडणारा हा रिंगण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.
राष्ट्रवादीचे नेते पार्थ पवार आणि शर्मिला पवार यांनी काटेवाडीच्या वेशीपासून ते पालखीच्या मुक्कामापर्यंत पालखीला सोबत केली. त्यांनी खांद्यावर पालखी वाहून वारीमध्ये आपला आगळा सहभागही नोंदवला. सोहळ्याचं स्वागत करण्याची पवार कुटुंबीयांची परंपरा असल्याचे पार्थ यांनी सांगितले.