पवार कुटुंबात घडामोडींना वेग, शरद पवार बारामतीला जाण्याची शक्यता

आजोबा शरद पवार यांनी खडसावल्यामुळे नाराज झालेल्या पार्थवरुन पवार कुटुंबातल्या घडामोडींना वेग आला आहे. 

Updated: Aug 16, 2020, 02:12 PM IST
पवार कुटुंबात घडामोडींना वेग, शरद पवार बारामतीला जाण्याची शक्यता title=

पुणे : आजोबा शरद पवार यांनी खडसावल्यामुळे नाराज झालेल्या पार्थवरुन पवार कुटुंबातल्या घडामोडींना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि त्यांची पत्नी प्रतिभा पवार सध्या पुण्यातल्या मोदी बागेत आहेत. पवार दाम्पत्य दुपारी अडीच वाजता बारामतीला जाण्याची शक्यता आहे. 

पार्थ पवार यांच्या नाराजीनंतर पवार दाम्पत्य पुण्यात आल्यानंतर आता वेगवान घडामोडी घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पार्थ पवार हे कालपासून बारामतीमध्येच आहेत. कालच पार्थ पवार यांनी बारामतीमध्ये काका श्रीनिवास पवार आणि काकी शर्मिला पवार यांची भेट घेतली. सोबतच रात्री उशीरा अजित पवार, सुनेत्रा पवार आणि श्रीनिवास पवार, शर्मिला पवार यांच्यात बैठक झाल्याचीही माहिती आहे. 

पवार कुटुंबात ही परिस्थिती असतानाच शरद पवार आणि प्रतिभा पवार बारामतीला जाऊ शकतात. त्यामुळे शरद पवार आणि प्रतिभा पवार यांच्या उपस्थितीमध्ये पार्थ पवार यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न होण्याची दाट शक्यता आहे. 

दोन दिवसांमध्ये पार्थ पवार यांच्या संदर्भातला विषय निवळेल, असा विश्वास पवार कुटुंबातील निकटवर्तीयांनी व्यक्त केला आहे. सोबतच पार्थ पवार हे नाराज असल्याचं पहिल्यांदाच पवार कुटुंबातील व्यक्तीने मान्य केलं. पार्थ पवार चूक का बरोबर हे ठरवता येणार नाही. तसंच शरद पवारांच्या मताविषयी प्रश्न उपस्थित करता येणार नाही. साहेबांचं कुटूंबातील ज्येष्ठत्व आणि वय याचाही विचार करायला हवा. या सगळ्यात पार्थ दुखावला जाणे स्वाभाविक आहे, अशी प्रतिक्रिया पवार कुटुंबातल्या निकटवर्तीयांनी दिली. 

पार्थ पवार हे अपरिपक्व आहेत, त्यांच्या मागणीला आम्ही कवडीचीही किंमत देत नाही, असं वक्तव्य शरद पवारांनी केलं. पवारांच्या या वक्तव्यानंतर राष्ट्रवादीमध्ये बैठकांची मालिका सुरू झाली. शरद पवारांनी केलेल्या या वक्तव्यानंतर अजित पवार यांनी मुंबईमध्ये लगेचच शरद पवारांची भेट घेतली. शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील या नेत्यांमध्ये बैठक झाली. दुसऱ्याच दिवशी पार्थ पवारही सिल्व्हर ओकवर जाऊन सुप्रिया सुळेंना भेटला. तब्बल सव्वादोन तास या दोघांमध्ये चर्चा झाली. एवढच नाही तर सुप्रिया सुळे यांनीही मंत्रालयात जाऊन अजित पवारांची भेट घेतली. 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x