जस्सापूर गावाने दाखवली माणुसकी, मदतीला असे धावले गावकरी

अरूण म्हेत्रे | Updated: May 14, 2018, 10:32 PM IST

अरूण मेहेत्रे, झी मीडिया, पुणे : माणुसकी नावाची गोष्टच कुठे शिल्लक नाही,  समाजातील संवेदनशीलता पार हरवलीय... असा निराशेचा सूर कायम कानावर पडतो. मात्र, यालाही एखादा अपवाद असतोच. पुण्यात उपचारांसाठी दाखल झालेल्या एका गावाकडच्या रुग्णाला गावातील लोकांनी कसं जीवदान दिलं त्याची ही गोष्ट.

मोहन भडांगे आता पूर्णपणे बरे झाले आहेत. ४२ वर्षांचे भडांगे मूळचे अमरावती जिल्ह्यातील जस्सापूरचे. पत्नी आणि २ मुलं असा त्यांचा संसार. ५ एकर कोरडवाहू शेती हे त्यांच्या उदर्निवाहाचं एकमेव साधन. गेल्या हंगामात बोन्ड अळीनं कपाशी संपवली, सोयाबीनचे भाव पडले, शेतकऱ्याची परिस्थिती बिकट झाली. त्यात दुष्काळात तेरावा महिना म्हणावा तसं मोहन भडांगेंना स्वाईन फ्लूनं ग्रासलं. 

आजार इतका बळावला की उपचारांसाठी थेट पुणं गाठावं लागलं. न्यूमोनिया झाला, किडन्या काम करेनाशा झाल्या. त्यामुळे मोठ्या इस्पितळात उपचार करायचे म्हटलं तर खर्चही मोठा... आता काय होणार आणि काय करायचं हा प्रश्न उभा राहिल्यावर भडांगेचा गाव मदतीसाठी धावून आला. 

गाव तसं ५०० लोकवस्तीचंच, पण गावातील माणसाप्रती आपुलकी बाळगून असलेलं. त्याच भावनेतून नातेवाईक, मित्रमंडळी आणि गावकरी मदतीसाठी पुढे सरसावले. प्रत्येकानं जमेल तसा हातभार लावला आणि बघता बघता १८/२० लाखाच्या खर्चाची पूर्तता झाली.

आर्थिक मदतीच्या जोडीला गावकऱ्यांची सद्भावना दिसून आली. कोणी त्यांच्या शुश्रूषेसाठी पुण्यात मुक्काम ठोकून होता तर कोणी त्यांच्या पश्चात त्यांची शेती वाहिली. हे सगळं आजच्या काळात खरोखरच दुर्मिळ आहे. 

पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात मोहन भडांगे यांच्यावर उपचार करण्यात आले. त्यांना जवळजवळ २ महिने रुग्णालयात राहावं लागलं. बिलाचा विषय आल्यावर रुग्णालयानं देखील बऱ्यापैकी सवलत दिली. त्यामुळे भडांगे यांना सर्वच स्तरांतून मदत झाल्याचं म्हणता येईल. अर्थात त्याला केवळ त्यांची आर्थिक परिस्थितीच कारणीभूत नाही, तर त्यांचा स्वभावही तितकाच किंबहुना त्यापेक्षा जास्त कारणीभूत आहे.

मोहन भडांगे हे गावातील एक खऱ्या अर्थानं सद्गृहस्थ आहेत. ते नेहमी इतरांच्या उपयोगी पडतात. दुसऱ्यांच्या सुख दुःखात सहभागी होतात. म्हणूनच आज त्यांच्यावर जेव्हा ही वेळ आली तेव्हा गावकऱ्यांनी संवेदनशीलता दाखवत माणुसकीचं दर्शन घडवलं. निराशेच्या वातावरणात आशेची किरणं म्हणतात ती हीच...