पिंपरी चिंचवड : आंधळ्या प्रेमात माणुसकीही विसरलेल्या एका नराधम पतीनं आपल्याच पत्नी आणि चिमुरड्याची हत्या केल्याची संतापजनक घटना पिंपरी चिंचवडमध्ये घडलीय. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी पतीसह त्याच्या साथीदारांना अटक केलीय. चिंचवडमधल्या सासूरवाडीवरुन परतत असताना हिंजवडीच्या पुढे नरेगाव रस्त्यावर कोयतेवस्ती जवळ अज्ञातांनी आपल्याला लुटण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आपली पत्नी अश्विनी भोंडवे आणि अवघ्या ८ महिन्यांच्या मुलाची हल्लेखोरांनी हत्या केल्याची तक्रार दत्ता भोंडवे यानं पोलिसांत केली. मात्र पोलिसांनी संशयावरुन दत्ता भोंडवेची अधिक चौकशी केली असता, प्रेयसीशी लग्न करता यावं यासाठी त्यानंच आपली पत्नी आणि लहानग्या बाळाची निर्दयी हत्या केल्याचं उघड झालं.
कोयतेवस्ती इथे साथीदारांच्या मदतीनं दत्तानं पत्नी आणि मुलाला संपवलं. हिंजवडी पोलिसांनी अवघ्या १२ तासांत या दुहेरी हत्याकांडाचा छडा लावला. या हत्याकांडाचं गुढ उकललं असलं तरी एक चिमुरडा आणि त्याच्या निर्दोष आईचा मात्र यात हकनाक बळी गेला.