पिंपरी चिंचवड : coronavirus कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन lockdown सुरु असताना काही महाभाग मात्र अद्यापही रस्त्यावर विनाकारण फिरताना दिसत आहेत. या परिस्थितीमध्ये पिंपरी चिंचवडमधून एक अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. जेथे सोमवारी सायंकाळच्या सुमारास अशाच काही व्यक्तींना हटकत जाब विचारल्यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांनाच मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.
पिंपरी- चिंचवड येथील काळेवाडीमध्ये हा प्रकार घडला असून, सीसीटीव्ही फूटेजमध्ये या प्रसंगाचा व्हिडिओ रेकॉर्ड झाल्याचं उघड झालं. पोलिसांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याप्रकरणी वाकड पोलिसांत तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
युनूस, मतीन आणि मोईन अशी गुम्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत. विश्वंभर कळकुटे या अतिक्रमण विभागातील कर्मचाऱ्यांकडून याप्रकरणीची फिर्याद दिली गेली.
देशभरात गेल्या काही दिवसांपासून सुरु असणाऱ्या लॉकडाऊनच्या नियामांचं अनेक ठिकाणी काटेकोरपणे पालन केलं जात आहे. पण, काही ठिकाणांवर मात्र सर्रास कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या नियमांचं उल्लंघन करण्यात येत आहे. याचाच प्रत्यय काळेवाडीतही आला.
संचारबंदी आणि जमावबंदीचे आदेश धुडकावत काही व्यक्ती हे येथे रस्त्यावर विनाकारण फिरत होते. त्यामुळे पोलिसांनी त्यांना हटकलं. पण, या व्यक्तींनी पोलिसांशीच वाद घालण्यास सुरुवात करत थेट त्यांच्यावर हातच उचलला. शिवाय त्यांना जीवे मारण्याचीही धमकी दिल्याची धक्कादायक बाब समोर येत आहे. ज्यामुळे पुन्हा एकदा पोलीस अधिकाऱ्यांची सुरक्षितता, नागरिकांचं बेजबाबदार वागणं हे मुद्दे चव्हाट्यावर आले आहेत.