PM Modi Birthday: 17 सप्टेंबर हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस असतो. आज त्यांना 74 वर्षे पूर्ण झाली. सार्वजनिक जीवनात त्यांनी अनेक दशके काम केले आहे. भाजपसह सर्व पक्षीय नेते तसेच देश विदेशातील नेत्यांनी पंतप्रधान मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधान मोदींच्या खासगी आयुष्याबद्दल अनेकांना उत्सुकता असते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावर घर नाहीय,त्यांच्या नावावर कोणती गाडीदेखील नाही. पंतप्रधान मोदी किती टॅक्स भरतात? अशा अनेक चर्चा त्यांच्याबद्दल होत असतात. याबद्दल जाणून घेऊया.
वाराणसी लोकसभा क्षेत्रातून तिसऱ्यांदा उमेदवारी अर्ज भरताना त्यांनी निवडणूक आयोगाला वैयक्तिक माहिती सादर केली. त्यानुसार पंतप्रधान मोदी यांच्याकडे 28 लाख इतकी संपत्ती असल्याचा दावा करण्यात आलाय. 2018 ते 2019 या काळात आपल्या संपत्तीत 52 टक्क्यांची वाढ झाली अशी माहिती यात देण्यात आली आहे. त्यांच्याकडे एकूण 3.2 कोटी इतकी संपत्ती आहे.
पंतप्रधान मोदींची बहुतांश जंगम मालमत्ता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये आहे. येथील अकाऊंटमध्ये त्यांच्याकडे 1.27 कोटी रुपयांच्या मुदत ठेवींच्या स्वरूपात आहे. प्रतिज्ञापत्रात पीएम मोदींनी यासंदर्भात माहिती दिली आहे. विशेष म्हणजे सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदावर असलेल्या पंतप्रधान मोदींकडे ना घर आहे ना गाडी. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नियमित आयकर भरणाऱ्या नेत्यांपैकी आहेत. प्रतिज्ञापत्रात त्यांनी दरवर्षी किती आयकर भरतो? याची माहिती दिली आहे. पंतप्रधान मोदींची संपत्ती 3 कोटी 2 लाख 6 हजार 889 रुपये इतकी आहे.
प्रतिज्ञापत्रात दिलेल्या माहितीनुसार पंतप्रधान मोदींच्या उत्पन्नाचा प्राथमिक स्रोत त्यांचा सरकारी पगार आणि त्यांच्या बचतीवरील व्याज आहे. यातूनच त्यांना सर्वाधिक उत्पन्न होते. 2024 च्या प्रतिज्ञापत्रात पीएम मोदींनी 2023-24 या आर्थिक वर्षात 3 कोटी 33 लाख 179 रुपये आयकर भरल्याचे सांगितले आहे.
पीएम मोदींनी आपल्या गेल्या 5 वर्षांच्या कमाईची माहितीही प्रतिज्ञापत्रात दिली आहे. त्यानुसार 2018-19 मध्ये पंतप्रधानांचे उत्पन्न 11 लाख 14 हजार 230 रुपये होते. जे 2019-20 मध्ये 17 लाख 20 हजार 760 पर्यंत वाढले. तर 2020-21 मध्ये पंतप्रधानांचे उत्पन्न 17 लाख 07 हजार 930 रुपये इतके होते. त्यानंतर 2021-22 मध्ये हे उत्पन्न 15 लाख 41 हजार 870 रुपये होते. तर 2022-23 मध्ये पंतप्रधान मोदींचे उत्पन्न 23 लाख 56 हजार 080 रुपये इतके होते. पंतप्रधान मोदींकडे सध्या प्रत्येकी 45 ग्रॅमच्या 4 सोन्याच्या अंगठ्या आहेत. ज्यांची किंमत 2 कोटी 67 लाख 750 रुपये आहे.
31 मार्च 2024 पर्यंत त्यांच्याकडे 24 हजार 920 रुपयांची कॅश असल्याची माहिती पंतप्रधान मोदींनी शपथपत्रात दिली आहे. त्याच वेळी 13 मे रोजी त्यांनी बँकेतून 28 हजार रुपये काढले. हे सर्व धरुन त्यांच्याकडे एकूण 52 हजार 920 रुपये रोख आहे. 31 मार्च 2019 पर्यंत त्यांच्याकडे 38 हजार 750 रुपये रोख आणि 4 हजार 143 रुपये बँकेत ठेवी होत्या. 2014 च्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्याकडे 32 हजार 700 रुपये रोख, 26.05 लाख रुपये बँकेत आणि 32.48 लाख रुपयांची एफडी होती.