PM Modi In Mumbai Today Rs 29000 Crore Projects: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज एकदिवसीय मुंबई दौऱ्यावर आहेत. शहरामधील पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या महत्त्वकांशी गोरेगाव-मुलुंड लिंक रोड प्रकल्पाअंतर्गत (तिसरा टप्पा) संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून जाणाऱ्या बोगद्याचं भूमिपूजन आज पंतप्रधानांच्या हस्ते पार पडणार आहे. गोरेगावमधील नेस्को एक्झिबिशन सेंटरमध्ये आयोजित विशेष समारंभामध्ये या ट्विन टनल्स म्हणजेच जुळ्या बोगद्यांच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडणार आहे. याचबरोबर ठाणे-बोरिवली दुहेरी बोगद्याच्या प्रकल्पाचेही भूमिपूजन मोदींच्या हस्ते होणार आहे. हा प्रकल्प मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून ओळखला जातो. मागील अनेक विधानसभा निवडणुकींमध्ये शिंदेंच्या जाहीरनाम्यामध्ये या प्रकल्पाचा आवर्जून उल्लेख आढळून आला आहे. मोदींच्या हस्ते आज राज्यातील एकूण 29 हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांचं भूमिपूजन, पायाभरणी होणार आहे. यामध्ये या दोन्ही बोगद्यांचे प्रकल्प मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहेत. हे दोन्ही प्रकल्प कसे आहेत यावर नजर टाकूयात...
ठाणे-बोरिवली दुहेरी बोगदा हा भारतामधील शहरी भागातील सर्वाधिक लांबीचा बोगदा आहे.
हा बोगदा बांधताना संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील जैवविविधता अबाधित ठेवत काम केलं जाणार आहे.
या बोगद्यामधून सिग्नल रहित आणि विना थांबा प्रवास करता येणार आहे.
बोगद्याच्या उभारणीसाठी 16 हजार 600 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.
ठाणे-बोरिवलीदरम्यान प्रवासाचा वेळ 1 तासाने कमी होणार.
दोन्ही महत्वाच्या शहरांमधील अंतर केवळ 12 मिनिटांवर येणार.
या मार्गावर दररोज किमान 1 लाख प्रवासी प्रवास करतील असा अंदाज.
या बोगद्यामुळे कार्बन उत्सर्जनात दरवर्षी 1,50,000 मेट्रिक टनांची घट होईल असं सांगितलं जात आहे.
गोरेगाव-मुलुंड जोडरस्ता दुहेरी बोगद्याची लांबी 12.2 किलोमीटर इतकी असणार आहे.
पर्यावरणाची हानी न करता संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून या बोगद्याचं बांधकाम केलं जाणार आहे.
संरक्षित वन्यजीवांच्या अधिवासाचे रक्षण होईल याची काळजीही घेतली जाणार आहे.
गोरेगाव-मुलुंड जोडरस्ता दुहेरी बोगदा प्रकल्पासाठी 6300 कोटींचा खर्च अपेक्षित आहे.
या बोगद्यामुळे कार्बन उत्सर्जनात दरवर्षी अंदाजे 23000 मेट्रिक टनाची घट होईल असा अंदाज आहे.
गोरेगाव-मुलुंडदरम्यानच्या प्रवासाची वेळ 75 मिनिटांवरुन थेट 20 मिनिटांवर येणार.
इंधन आणि प्रवासाच्या वेळामध्ये मोठी बचत होणार आहे.
याशिवाय आज मोदींच्या हत्से मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा शुभारंभ होणार असून त्यासाठी 5,540 कोटी रुपयांचा निधीन देण्यात आला आहे. तसेच कल्याण यार्ड रिमॉडेलिंग प्रकल्प (813 कोटी रुपये), लोकमान्य टिळक टर्मिनस येथे नव्या प्लॅटफॉर्मचे लोकार्पण (64 कोटी रुपये), छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे विस्तारित प्लॅटफॉर्म क्रमांक 10 आणि 11 चं लोकार्पण (52 कोटी रुपये) आणि तुरभे येथे गति शक्ती मल्टी मॉडेल कार्गे टर्मिनस प्रकल्पाची पायाभरणी (27 कोटी रुपये) केली जाणार आहे.