PM Modi Speech In Ramtek : चंद्रपूर येथील सभेनंतर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा नागपूरमधील रामटेक लोकसभा मतदारसंघात झाली. मोदींनी आपल्या भाषणाची सुरूवात मराठीत केली. भाषणात बोलताना मोदींनी पुन्हा भाजप सरकार येणार, असा विश्वास देखील मोदींनी व्यक्त केलाय. जेव्हा मोदींना शिव्या पडतात तेव्हा समजून जा, कल कोणाच्या दिशेने आहे. आगामी 1000 वर्षाचं भविष्य चांगलं रहावं, यासाठी भाजपला मतदान करा. गरिबाचा मुलगा पंतप्रधान झाल्यावरच तुम्हा देश धोक्यात दिसतो का? आणीबाणी आणली गेली तेव्हा लोकशाही संकटात नव्हती का? असा सवाल मोदींनी विचारला आहे.
जेव्हा तुम्ही अयोध्येला जाल तेव्हा रामलल्ला टेंडमध्ये नाही तर भव्य मंदिरात दिसतील. रामटेकच नाही तर संपूर्ण देशात आनंदाचं वातावरण आहे. इंडिया आघाडी सनातन धर्मावर टीका करतात. त्यांना समाजात तेढ निर्माण करायचाय. यांनी ओबीसी समाजाला विकासाच्या मार्गावर आणलं नाही. इंडिया आघाडीला त्यांच्या पापाची शिक्षा मिळालया हवी, अशी टीका नरेंद्र मोदी यांनी केली आहे. काठी मारल्याने पाणी दुभंगत नाही, असं म्हणत मोदींनी काँग्रेसचा समाचार घेतला.
काँग्रेसने बाबासाहेबांना भारतरत्न दिलं नाही. काँग्रेसने मागासवर्गियांना विकासापासून लांब ठेवलं. देशात प्रथमच आदिवासी महिला देशाच्या राष्ट्रपती झाल्या. काँग्रेसने संपूर्ण संविधान का लागू केलं नाही. 370 कलम का रद्द केलं नाही? असं म्हणत मोदींनी काँग्रेसवर सडकून टीका केली आहे. महाराष्ट्रात भाजपने कोणतीही कसर सोडली नाही. शिंदे, अजित आणि देवेंद्र चांगलं काम करत आहे. पाण्याच्या समस्या तसेच अनेक सुविधांचे उपाय योग्यरित्या सोडवण्यात आले, असंही मोदी म्हणाले. तुमचं स्वप्न हेच मोदीची संकल्पना. लोकांना घरोघरी जाऊन सांगा.. मोदी रामटेक आले होते, त्यांनी तुम्हाला रामराम सांगितलाय, असंही मोदी म्हणाले आहेत.
नितिन गडकरी काय म्हणाले?
विदर्भातील सर्व 10 च्या 10 जागा भाजप जिंकणार, असा विश्वास नितिन गडकरी यांनी व्यक्त केला आहे. संविधान भाजपसाठी पवित्र आहे. जात, धर्म, पंथाच्या आधारे सरकार निर्णय घेत नाही. 60 वर्षात जे काँग्रेसने करून दाखवलं, ते भाजप सरकारने करून दाखवलंय. मोदींच्या नेतृत्वात चांगलं काम झालंय. मोदींच्या काळात देशाचा चेहरा बदलला आहे. संविधान तोडण्याचं पाप काँग्रेसने केलंय, अशी टीका देखील गडकरींनी केली आहे.
रामटेकचं राजकीय गणित
रामटेकचे विद्यमान खासदार कृपाल तुमाने यांनी नुकताच शिंदे गटात प्रवेश केला. मात्र त्यांच्या विरोधात नाराजी असल्यानं त्यांचं तिकीट कापण्यात आलं. त्यांच्याऐवजी ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमधून उमरेडचे आमदार राजू पारवेंना आयात करण्यात आलं. त्यांच्या हाती शिवसेनेचा धनुष्यबाण देऊन निवडणुकीच्या रणांगणात उतरवण्यात आलं. काँग्रेसमधून आपल्या मुलाला तिकीट मिळावं, यासाठी नितीन राऊतांनी फिल्डिंग लावली. मात्र, हायकमांडनं सुनील केदार यांच्या मर्जीतल्या रश्मी बर्वेंना उमेदवारी दिली. त्यांचं दुर्दैव असं की, जात पडताळणी समितीनं त्यांचं जात प्रमाणपत्र रद्द केलं. परिणामी त्यांचा उमेदवारी अर्जच बाद करण्यात आला. त्यांच्या जागी आता पती श्यामकुमार बर्वे काँग्रेसकडून लढत आहेत.