Modi On CJI Chandrachud Home Ganesh Pujan: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीमध्ये आज वर्ध्यामध्ये विश्वकर्मा योजनेतील एक लाख लाभार्थ्यांना डिजिटल आयडी, डिजिटल स्किल सर्टिफिकेट देण्यात आले. 75 हजार लाभार्थ्यांना डिजिटल स्वरूपात कर्ज मंजूर करण्यात आले. या कार्यक्रमामध्ये भाषण करताना पंतप्रधानांनी सरन्यायाधीस धनंजय चंद्रचूड यांच्या घरी गणरायाच्या आरतीला गेल्याने झालेल्या वादावर भाष्य करत काँग्रेसवर निशाणा साधला. पंतप्रधानांनी काँग्रेसला पुन्हा संधी द्यायची नाही, असं आवाहन उपस्थितांना केलं.
"देशातील सर्वात भ्रष्ट परिवार म्हणजे काँग्रेसमधील शाही परिवार आहे," असं म्हणत पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर निशाणा साधला. पुढे पंतप्रधानांनी सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या घरी पुजेला गेल्याच्या मुद्द्यावरुन विरोधकांनी घेतलेल्या आक्षेपाचा संदर्भ देत टीका केली. "गणपती पुजेसाठी काँग्रेसचा विरोध आहे. टिळकांनी गणेशोत्सव देशाच्या एकतेसाठी सुरू केला. काँग्रेसला गणेश पुजेचीही चीड आहे. मी गणेश पुजेसाठी गेलो तेव्हा त्यांचं तुष्टीकरणाचं काम सुरु झालं," अशी टीका पंतप्रधान मोदींनी केली. तसेच पुढे बोलताना पंतप्रधानांनी, "काँग्रेस सरकारने कर्नाटकात गणपतीलाही जेलमध्ये टाकलं," अशी टीका केली. "महाराष्ट्र गणपतीची आराधना करतो. देशात गणपतीच्या अपमानवरून संताप आहे. काँग्रेसचे नेते यावर बोलले नाहीत. याला आपल्याला उत्तर द्यायचं आहे. आपण सर्व सोबत मिळून महाराष्ट्राचा गौरव वाढवू, स्वप्न पूर्ण करू," असं आवाहन उपस्थितांना केलं.
काँग्रेस पक्ष 'तुकडे तुकडे गँग', 'अर्बन नक्षलां'कडून चालवला जातो, अशी टीका पंतप्रधानांनी आपल्या भाषणामध्ये केली. तसेच उपस्थितांना आवाहन करताना, "काँग्रेसला पुन्हा संधी द्यायची नाही," असं म्हटलं. "झूट, धोका और बेईमानी हे काँग्रेसचे काम आहे. महाराष्ट्रात आपल्याला यांच्या धोखधाडीपासून दूर राहायचं आहे," असं पंतप्रधानांनी उपस्थितांना सांगितलं. तसेच पुढे बोलताना, "आजच्या काँग्रेसमध्ये देशभक्तीच्या आत्म्याने दम तोडला आहे. विदेशात जाऊन देशविरोधी अजेंडे देश तोडण्याचे अजेंडे चालवत आहेत," असंही मोदी म्हणाले.
"वर्षांपूर्तीसाठी आम्ही वर्ध्याला निवडलं कारण हा कार्यक्रम केवळ शासकीय नाही तर हजारो वर्षांपासूनच्या कौशल्याला वापरण्याचं मध्यम आहे," असं पंतप्रधान आपल्या भाषणात म्हणाले. "भारतीय ज्ञान विज्ञानाला सुतार, लोहार, सोनार, कुंभार, मूर्तिकार हे घटक घरोघरी पोहोचवायचे आहेत. गुलामीच्या काळात इंग्रजांनी हे टॅलेंट संपविण्यासाठी अनेक प्रयत्न केले. गांधींनी इथूनच ग्रामीण उद्योगाला चालना देण्यासाठी प्रयत्न केले. मात्र स्वतंत्रोत्तर काळातील सरकारांनी या गोष्टीला महत्त्व न देता विश्वकर्मा समाजाची उपेक्षा केली," असं म्हणत पंतप्रधानांनी अप्रत्यक्षपणे काँग्रेसवर निशाणा साधला. तसेच सत्तेत आल्यापासून आपण यासाठी प्रयत्न करत असल्याचंही मोदी म्हणाले. "आमच्या सरकारने या परंपरागत कौशल्याला प्रोत्साहन देण्यासाठी विश्वकर्मा योजना आणली. सन्मान, सशक्तीकरण आणि समृद्धी हे विश्वकर्मा योजनेचं उद्दिष्ट आहे. देशातील 700 हुन अधिक जिल्हे आणि अडीच लाखांहून अधिक ग्रामपंचायती अभियानाला गती देत आहेत. वर्षभरात 20 लाख लोकांना जोडलं गेलं आहे. 8 लाख कामगारांना कौशल्य प्रशिक्षण देण्यात आलं आहे," असं मोदी म्हणाले.