जयेश जगड, झी मीडिया, अकोला : जिल्ह्यातील पिंजर पोलीस स्टेशनचे ठाणेदार नंदकिशोर नागलकर यांनी अॅन्टी करप्शनच्या पीएसआयवर गोळीबार केला आहे. एसीबीचे पोलीस उपनिरीक्षक सचिन धात्रक हे लाचलुचपत प्रचिबंधक विभागाकडून कारवाईसाठी गेले होते. तेव्हा ठाणेदार नंदकिशोर नागलकरने, एसीबी पीएसआय सचिन धात्रक यांच्यावर सर्व्हिस रिव्हॉल्वरने गोळी झाडली. यात सुदैवाने सचिन धात्रक बचावले आहेत, पण त्यांच्य हाताला तसेच पायाला गोळी लागल्याने ते जखमी झाले आहेत.
गोळीबारात गंभीर जखमी झालेले सचिन धात्रक यांना उपचारासाठी अकोला जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ठाणेदार नंदकिशोर नागलकर यांच्या विरोधात अनेक तक्रारी वरिष्ठांकडे करण्यात आल्या होत्या.
मात्र आज आपल्यावर लाचलुचपत विभागाची कारवाई होणार असल्याची कुणकुणी नंदकिशोर नागलकर यांना लागली आणि त्यातून त्यांनी गोळीबार केला असा त्यांच्यावर आरोप होत आहे.
या घटनेनंतर जिल्हा पोलिस अधिक्षकांनी घटनास्थळावर धाव घेतली आहे. तसेच पिंजर पोलीस स्टेशनचे ठाणेदार नंदकिशोर नागलकर यांना तात्काळ अटक करण्यात आली आहे.