नगरच्या निवडणुकीसाठी श्रीपाद छिंदमला पोलीस संरक्षण

अहमदनगरच्या महापौरपद निवड प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी पोलीस संरक्षण 

Updated: Dec 27, 2018, 10:51 AM IST
नगरच्या निवडणुकीसाठी श्रीपाद छिंदमला पोलीस संरक्षण title=

अहमदनगर : छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह विधान करणारा अपक्ष नगरसेवक श्रीपाद छिंदम याना पोलीस संरक्षण देण्यात आलंय. अहमदनगरच्या महापौर-उपमहापौरपदाच्या निवडणुकीत सहभागी होण्यासाठी छिंदम यांना हे संरक्षण देण्यात येणार असून त्याच्यासोबत दोन पोलीस कर्मचारी असणार आहे. २८ डिसेंबरला होणाऱ्या महापौरपद निवड प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी पोलीस संरक्षण देण्यात यावं, अशी मागणी करणारं पत्र छिंदम यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयाला लिहिलं होतं.

फोनवर बोलताना शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक भाषा वापरल्यामुळे छिंदम चर्चेत आले होते. छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आणि शिवजयंती विषयी अपशब्द वापरणाऱ्या  श्रीपाद छिंदम  यांना भाजपाने महापौर पदावरून पदच्युत करतानाच पक्षातूनही बडतर्फ केलं होतं. त्यानंतर १० डिसेंबर रोजी जाहीर झालेल्या अहमदनगर महापालिका निवडणूक निकालात छिंदम यांनी भाजपचे उमेदवार प्रदीप परदेशी यांना पराभूत केलंय. प्रभाग क्रमांक ९ क मधून श्रीपाद छिंदम यांचा विजय झाला आहे.

१२ डिसेंबर रोजी  श्रीपाद छिंदम  तडीपारीची मुदत संपल्यानंतर शहरात झालेत. शहरात दाखल झाल्यानंतर छिंदम यांनी आपल्या कार्यालयातल्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला तसंच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यांचंही छिंदम यांनी पूजन केलं.