१ कोटी ७० लाखांची लाच घेताना वकिलाला रंगेहाथ अटक

पुण्यातील बंडगार्डन परिसरात बुधवारी रात्री ही कारवाई करण्यात आलीय

Updated: Dec 27, 2018, 12:38 PM IST
१ कोटी ७० लाखांची लाच घेताना वकिलाला रंगेहाथ अटक title=

पुणे : पुण्यातील रोहित शेंडे नावाच्या वकिलाला तब्बल एक कोटी सत्तर लाख रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केलीय. पुण्यातील बंडगार्डन परिसरात बुधवारी रात्री ही कारवाई करण्यात आलीय. वकील रोहित शेंडेने महसूल विभागातील उपसंचालकांच्या कार्यालयातील जमिनीशी संबंधित कागदपत्रे मिळवून देण्यासाठी तक्रारदाराकडे एक कोटी सत्तर लाख रुपयांची मागणी केली होती. त्यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. 

त्यानंतर, लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं बंडगार्डन परिसरात सापळा लावला. पाच लाख रुपयांच्या खऱ्या नोटा आणि एक कोटी ६५ लाख रुपयांच्या खोट्या नोटा घेऊन तक्रारदार वकील शेंडेला भेटला. आणि तिथे आधीच दबा धरून बसलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी वकील रोहित शेंडेला रंगेहाथ अटक केली. रोहित शेंडेला आज न्यायालयात हजर केले जाईल.