लातूर : लातूर जिल्ह्याच्या औसा तालुक्यातील देवंग्रा येथे एका पोलिस कर्मचाऱ्यानेच बियरबारमध्ये तोडफोड आणि मारहाण करीत धुडघुस घातल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे.
औसा तालुयातील देवंग्रा येथे 'हॉटेल नंबर एक' बार आणि रेस्टॉरंट आहे. या बारवर पोलिस कर्मचारी असलेल्या सतीश खंडेराव जाधव याने जुन्या भांडणाची कुरापत काढून या बारवर आपल्या साथीदारांसह चक्क हल्ला चढविला.
अंगात हिरवा टी-शर्ट आणि डोक्यावर गॉगल असलेल्या पोलिस कर्मचारी सतीश खंडेराव जाधव आणि त्याच्या साथीदारांनी बार \\मध्ये घुसताच रिकाम्या बाटल्या फोडण्यास सुरुवात केली. त्यानंतर बारमध्ये उपस्थित असलेले मॅनेजर विश्वंभर तेलंगे आणि वेटर सागर बळवंते यांना हातात येईल त्या रॉडने, फोडलेल्या बाटल्यानी जबर मारहाण करण्यास सुरुवात सुरु केली. ज्यात विश्वंभर तेलंगे यांना फोडलेल्या बाटल्यानी आणि रॉडने मारल्यामुळे ते जबर जखमी झाले आहेत.
गडचिरोली येथे पोलिस कर्मचारी असलेला सतीश खंडेराव जाधव हा मूळचा लातूर जिल्ह्यातील तुपडी गावचा रहिवासी आहे. घटनेच्या आदल्यादिवशी रात्री क्षुल्लक कारणावरून बारमधील कर्मचाऱ्यांसोबत पोलिस असलेल्या सतीश जाधव याचा वाद झाला होता. त्याचाच राग धरून हा हल्ला झाल्याचे बार मालक असलेल्या चंद्रकांत जाधव यांनी पोलीस तक्रारीत म्हटले आहे.
यावेळी दिलेल्या तक्रारीवरून आणि सीसीटीव्ही फुटेज वरून औसा पोलिस ठाण्यात आरोपी पोलिस कर्मचारी सतीश खंडेराव जाधव आणि त्याच्या इतर साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर बार मालक असलेल्या चंद्रकांत जाधव यांना तुपडी ग्रामस्थ आणि पोलिसांच्या नातेवाईकांकडून तक्रार मागे घेण्यासाठी धमक्या येत असल्याचे फिर्यादी सांगत आहेत. एकूणच या घटनेवरून रक्षक असणारे पोलिस भक्षक झाल्याचेच दिसून येत आहे.