औरंगाबाद : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Uddhav Thackarey ) हे आज औरंगाबादमध्ये ( Aurangabad Sabha ) सभा घेत आहेत. मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी औरंगाबाद येथील अनेक कार्यक्रमांना हजेरी लावली. मात्र, आज पहिल्यांदाच ते औरंगाबादमध्ये पक्षीय जाहीर सभा घेत आहेत.
मराठवाड्यातील औरंगाबाद येथे शिवसेनेची पहिला शाखा 8 जून 1985 रोजी स्थापन झाली. या शाखेच्या 37 व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
औरंगाबाद येथील सभेसाठी शिवसेनेने ( Shivsena ) आपली पूर्ण ताकद पणाला लावली आहे. या सभेला एक लाखांहून अधिक शिवसागर येऊन धडकेल असा विश्वास शिवसेनेने व्यक्त केलाय. पोलिसांनीही या सभेसाठी तगडा पोलिस बंदोबस्त लावला आहे.
ही सभा विक्रमी होणार असं शिवसेना म्हणते तर एमआयएम ( MIM ) आणि भाजपनं ( BJP ) पहिले शहराला पाणी द्या आणि नंतर सभेचे राजकारण करा असा टोला लगावला आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नेमके काय बोलणार या शहराचे नाव खरंच संभाजीनगर ( Sambhaji Nagar ) करणार का? त्याची घोषणा करणार का? पाण्याचा प्रश्न सोडवणार का? अशा अनेक मुद्द्यांची औरंगाबादच्या नागरिकांनाही प्रतीक्षा आहे.
दरम्यान, या सभेआधी भाजपने शिवसेनेच्या या सभेविरोधात पोस्टरबाजी सुरु केली आहे. संभाजीनगर नामकरणाच्या आश्वासनाचा आज वर्धापन दिन आहे. 'उत्तर मागतोय संभाजीनगर' अशा पद्धतीने बॅनरबाजी करून भाजपने शिवसेनेला डिचवलं आहे.