प्रशांत परिचारक अखेर विधानपरिषदच्या कामकाजात सहभागी होणार

 28 फेब्रुवारी 2018ला प्रशांत परिचारक यांचे निलंबन मागे घेण्यात आलं. 

Updated: Jun 20, 2019, 11:32 PM IST
प्रशांत परिचारक अखेर विधानपरिषदच्या कामकाजात सहभागी होणार title=

अमित जोशी, झी मीडिया, मुंबई : सैनिकांच्या पत्नीबद्दल वादग्रस्त विधान करत वादात सापडलेले विधानपरिषद सदस्य प्रशांत परिचारक हे अखेर विधानपरिषदच्या कामकाजात सहभागी होणार आहेत. विधानपरिषदचे सभापती रामराजे निंबाळकर यांनी याबाबतची घोषणा विधानपरिषदमध्ये केली.भाजपचा पाठींबा असलेले विधानपरिषद सदस्य प्रशांत परिचारक यांनी वादग्रस्त केल्यावर विधानपरिषदच्या सभागृहाने 9 मार्च 2017 ला दीड वर्षाकरता निलंबित केलं होतं. त्यानंतर उच्चधिकार समितीचा अहवाल आल्यावर 28 फेब्रुवारी 2018ला प्रशांत परिचारक यांचे निलंबन मागे घेण्यात आलं. 

तरीही विधानपरिषद सभागृहात येण्यास, कामकाजात सहभागी होण्यास भाजप वगळता शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीसह सर्व पक्षांच्या सदस्यांचा मोठा विरोध होता. भाजपला कोंडीत पकडण्यासाठी विरोधीपक्षापेक्षा शिवसेनेने प्रशांत परिचारक यांचा मुद्दा सर्वात आक्रमकपणे लावून धरला होता.

मात्र गेल्या काही दिवसांत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेलं आहे. भाजप शिवसेनेची निवडणुकीत पून्हा युती झालेली आहे. भाजप-शिवसेनेनं हातमिळवणी केलेली आहे. त्यातच युतीचे संख्याबळ वाढल्याने सभापती पद घेण्याकडे हालचाल सुरू आहे. म्हणून राष्ट्रवादीने नमतं धोरण घेत परिचारक यांच्या मुद्दयावरचा पक्षाचा विरोध गुंडाळून ठेवला.

फक्त काँग्रेसने परिचारक यांना कामकाजात सहभागी होऊ दिल्याबद्दल विरोध व्यक्त केला.इतके दिवस विधानपरिषद कामकाजपासून दूर राहिलेले वादग्रस्त सदस्य प्रशांत परिचारक हे आता विधानपरिषदच्या कामकाजात सहभागी होणार आहेत.