उत्तर महाराष्ट्रात वादळी वारा, गारपीटीसह मान्सूनपूर्व पाऊस

 या पावसामुळं भाजीपाल्याचं आतोनात नुकसान तर झालंच. पण, डाळिंब, द्राक्षबागांनाही मोठा फटका बसला.. विजेचे खांब, झाडे, शेड आदींचे देखील मोठे नुकसान झाले आहे.

Updated: Jun 2, 2018, 12:59 PM IST
उत्तर महाराष्ट्रात वादळी वारा, गारपीटीसह मान्सूनपूर्व पाऊस title=

 नाशिक: यंदा मेघराजा काहीसा भलताच खूश दिसतोय. त्यामुळे मान्सूनपूर्व पावसाने राज्यातील विविध ठिकाणी हजेरी लावण्यास सुरूवात केली आहे. नाशिक जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रातील काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारपीट आणि मान्सूनपूर्व पाऊस अचानक झाला. या पावसाने अनेक ठिकाणी पिकांचं मोठं नुकसान झालंय. त्यामुळे आधीच विविध कारणांनी बेजार झालेल्या शेतकऱ्यांच्या अडचणींत या पावसानं आणखीन भर पडलीय. नाशिकमधील सिन्नर तालुक्यातील पांढुर्ली – भगुर या गावांमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला.  पावसासोबत काही भागात जोरदार गारपीटदेखील झाली. या पावसामुळं भाजीपाल्याचं आतोनात नुकसान तर झालंच. पण, डाळिंब, द्राक्षबागांनाही मोठा फटका बसला.. विजेचे खांब, झाडे, शेड आदींचे देखील मोठे नुकसान झाले आहे.

मोठ्या प्रमाणावर वित्त हानी

येवला तालुक्याचा उत्तर पुर्व भागात ढग व वीजांचा कडकडाटामध्ये वादळी वाऱ्यांसह पावसाने  हजेरी लावली. वादळी पाऊसाने सायगाव गवंडगाव बोकटे परिसरात विद्युत लाईनचे टॉवर सह वृक्ष उन्मळून पडले, तर अनेक ठिकाणी घरांचे पत्रे उडून गेल्याने भरपूर नुकसान झाले. तर, काल रात्री झालेल्या पावसामुळे अकोले संगममेर तालुक्यात अनेक झाड पडली आहेत निळवंडे चितळवेढे हा रस्ता झाडे पडल्याने बंद झालाय तर संगनमेर तालुक्यातील वडगावपान येथील स्वामी समर्ध केंद्राची सैरक्षत भिंतही कोसळली आहे.

पश्चिम महाराष्ट्रातही पावसाचा तडाखा

सातारा जिल्ह्यात महाबळेश्वर , पाचगणी , कराड ,पाटणसह कोरेगाव खटाव तालुक्यात जोरदार वा-यासह विजेच्या कडकटासह जोरदार पाउस झाला. जोरदार वा-यामुळे कोरेगाव तालुक्यातील २२ घरांचे पत्रे उडुन गेले. कराड शहर व परिसरात अजूनही जोरदार पाउस सुरुच आहे. वादळी वा-यामुळे कराड तालुक्यातील पपई पिकाचं मोठं नुकसान झालं आहे. 

शेकडो एकरातील पपई जमिनदोस्त झाली आहे. तर, जळगाव जिल्ह्यातील रावेर परिसरातही सायंकाळी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस कोसळला. यामुळं वाघोड, खानापूर तसच पुनखेडा या गावांमध्ये केळी बागांचं मोठं नुकसान झालंय. हवेचा वेग जास्त असल्यानं रावेर बऱ्हाणपूर रस्त्यावर अनेक वृक्ष उन्मळून पडलेत.  पहिल्याच दिवशी हजेरी लावलेल्या या पावसाने वातावरणात गारवा निर्माण झालायं. त्याचप्रमाणे केळ्यांच देखील नुकसान झालं आहे.