सुभाष देशमुखांचा सोलापुरातील बंगला बेकायदेशीर; अहवाल

देशमुखांविरोधात अहवाल देऊन आयुक्त गेले रजेवर

Updated: Jun 2, 2018, 12:21 PM IST
सुभाष देशमुखांचा सोलापुरातील बंगला बेकायदेशीर; अहवाल title=

सोलापूर: सोलापुरातील वादग्रस्त बंगल्याच्या बांधकामप्रकरणी सहकारमंत्री सुभाष देशमुख अडचणीत आलेत. सुभाष देशमुखांचा सोलापुरातील बंगला बेकायदेशीर असल्याचा अहवाल महापालिका आयुक्तांनी दिलाय. देशमुख यांचा बंगला आरक्षित जागेत आहे. या बंगल्याची जमीन महापालिकेच्या अग्निशमन विभाग, व्यापारी गाळ्यांसाठी आरक्षित आहे. त्याठिकाणी देशमुख यांनी आपला टोलेजंग बंगला बांधलाय. अग्निशमन दलाच्या आरिक्षित जागेवर हा बंगला बांधल्याचं अहवालातून स्पष्ट झालंय. २६ पानांचा हा अहवाल उच्च न्यायालयात सादरकरण्यात आलाय. अहवालात सुभाष देशमुख यांच्या बंगल्याच्या कामावर आक्षेप नोंदवण्यात आलेत. त्यामुळे सहकार मंत्री सुभाष देशमुख याच्यापुढे नवे संकट उभे ठाकणार आहे. दरम्यान, या संदर्भात न्यायालयाचा पुढील निर्णय काय असेल याकडे सोलापूरकरांचे लक्ष लागून आहे. 

काय आहे प्रकरण?

पालिकेच्या अग्निशामक दलासाठी आरक्षित असलेल्या जागेवर सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी बेकायदा घर बांधल्याची तक्रार न्यायालयात दाखल झाली होती . न्यायालयाने या प्रकरणी चौकशी करून ३१ में पर्यंत अहवाल देण्याचे आदेश पालिका प्रशासनास दिले होते . त्यानुसार आयुक्त अविनाश ढाकणे यांनी या प्रकरणांची सुनावणी घेऊन न्यायालयाला अहवाल सादर केला असून हा आवाहल सहकार मंत्र्याच्या विरोधात असल्याचे समजते. 

देशमुखांविरोधात अहवाल देऊन आयुक्त गेले रजेवर

देशमुख यांच्या विरोधातील अहवाल म्हणजे बांधकाम परवाना रद्द झाल्याचे मानले जात आहे. दरम्यान, या अहवालानंतर राजकीय वर्तुळात आणि सोलापूर शहरात एकच खळबळ उडाली आहे. मात्र, हा अहवाल देऊन पालिका आयुक्त रजेवर गेले आहेत. त्यामुळे रजेवर जाण्यापूर्वी आयुक्तांनी सरकारमंत्री देशमुकांना चांगलाच दणका दिल्याची चर्चा आहे.