मोठी बातमी : महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू ​

महाराष्ट्राच्या इतिहासात तिसऱ्यांदा राष्ट्रपती राजवट लागू 

Updated: Nov 12, 2019, 07:03 PM IST
मोठी बातमी : महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू ​ title=

मुंबई : महाराष्ट्रात निर्माण झालेल्या सत्तासंघर्षात राज्यात राष्ट्रपती लागू करण्याचे आदेश राष्ट्रपतींकडून देण्यात आलेत राष्ट्रपतींच्या आदेशानंतर ही घोषणा करण्यात आलीय. महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या केंद्रीय मंत्रिमंडळाने केलेल्या शिफारशीच्या फाइलवर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी अखेर स्वाक्षरी केलीय. महाराष्ट्राच्या इतिहासात तिसऱ्यांदा राष्ट्रपती राजवट लागू करण्यात येतेय. धक्कादायक म्हणजे, सोमवारी सायंकाळी खुद्द राज्यपालांनी राष्ट्रवादी काँग्रेसला बोलावून मंगळवारी रात्री ८.३० वाजेपर्यंत सरकार स्थापन करण्याची मुदत दिल्याचं सांगितलं होतं. मात्र, आज सायंकाळी ५.३० वाजल्याच्या सुमारास राष्ट्रपती राजवट लागू करण्याची घोषणा करण्यात आलीय. 

राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर राजभवन आणि परिसरात पोलीस सुरक्षा वाढवण्यात आलीय. राज्य राखीव पोलीस दलही तयार आहे. पोलीस अधिकाऱ्यांनीही राज्यपालांची भेट घेतलीय. आता राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर सर्व कार्यभार राज्यपाल पाहणार असल्याने सुरक्षा व्यवस्थेबाबत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी चर्चा केलीय. 

 

 

राष्ट्रवादीचे विधिमंडळ गटनेते अजित पवार यांनी राज्यपालांना फोन करून सत्तेचा दावा करण्यासाठी वेळ वाढवून मागितला होता. त्यानंतर राज्यपालांनी राष्ट्रपती राजवटीची शिफारस करणारं पत्रं धाडलं होतं. राज्यपालांनी घटनेच्या कलम ३५६ नुसार केंद्रीय गृहमंत्रालयाला अहवाल सादर केल्याची माहिती राजभवनानं दिलीय. राज्यपालांनी घटनेच्या कलम ३५६ नुसार अहवाल सादर करण्यात आला होता. याबद्दल खुद्द राज्यपालांनी ट्विटरद्वारे माहिती दिली होती. 

निकाल लागून २० वा दिवस उजाडला तरी महाराष्ट्रातील सरकार स्थापनेचा घोळ संपलेला नाही. त्यामुळे, राज्यपालांच्या शिफारस पत्रानंतर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी, असा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला होता. 

दरम्यान, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे केंद्र सरकारच्या इशाऱ्यावर काम करतात, असा घणाघाती आरोप शिवसेनेकडून करण्यात आला आहे