प्रफुल्ल पवार, झी मीडिया, रायगड : कोकणात जाणाऱ्या एकमेव आणि महत्वाच्या मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचं घोंगडं गेल्या सहा वर्षांपासून भिजत पडलंय. त्याचा कोकणात येणाऱ्या प्रवाशांना आणि पर्यटकांना प्रचंड त्रास होतोय. खडडयांबरोबरच धुळीचाही त्रास सहन करावा लागतोय.
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आठ महिन्यांपूर्वी '2018च्या अखेरपर्यंत मुंबई-गोवा महामार्गाचं चौपदरीकरण पूर्ण होईल' असं आश्वासन दिलं होतं. भाजप सरकारच्या काळात देशभरात रस्त्यांच्या कामाचा वेग वाढल्याचा दावा केला जातोय. मात्र, परिस्थिती बरोबर याउलट आहे. 2017 संपत आलं तरी अजून पळस्पे ते इंदापूर या 84 किलोमीटरच्या पहिल्या टप्प्यातील निम्मं कामही पूर्ण झालेलं नाही. गेल्या 6 वर्षांपासून हे काम रखडलंय. त्यामुळे महामार्गावर पहायला मिळताहेत ते फक्त खडडेच खड्डे...
मुंबई-गोवा महामार्गाच्या पळस्पे ते इंदापूर या पहिल्या टप्प्यातील कामाला 2011 मध्ये मंजुरी देण्यात आली. सरकार बदलून तीन वर्ष लोटली. मात्र, मुंबई -गोवा महामार्गाची परिस्थिती काही बदलली नाही. या दिरंगाईमुळे प्रकल्पाचा खर्च मात्र वाढत चाललाय. वाहनांचा वेग मंदावल्यानं वाहतूक कोंडी नित्याचीच झालीय. अपघातांचा आलेख उंचावलाय.
2017 मध्ये जुलैपर्यंत रायगड जिल्ह्याच्या हद्दीत मुंबई-गोवा महामार्गावर 213 अपघात झालेत. यात 40 जणांना जीव गमवावा लागला. तर 233 जण जखमी झाले. यापैकी 121 जण गंभीर होते. यातील काहींचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
एकीकडे सामान्य माणसाला रस्त्यासारखी प्राथमिक सुविधा मिळत नसताना दुसरीकडे बुलेट ट्रेन आणली जातेय. सरकार बदलो अथवा ठेकेदार सामान्य प्रवाशांच्या जीवनात काहीच फरक पडलेला दिसत नाही. त्यामुळे दुर्दैवाचे दशावतार केव्हां संपणार असा सवाल आता सामान्य प्रवासी उपस्थित करतायत.