मुंबई : भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मावर यांच्या अडचणीत आणखीण वाढ झाली आहे. रझा अकादमीने दाखल केलेल्या तक्रारीची दखल मुंबई पोलिसांनी घेतली असून त्यांना आता समन्स बजावले आहे. नुपूर शर्मा यांना 13 जून रोजी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
नुपूर शर्मा यांनी 27 मे ला प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्यावर आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. या वक्तव्याने देशातील वातावरण चांगलेच तापले आहे. तसेच या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी नुपूर शर्मा यांच्याविरोधात देशभरातील अनेक पोलिस ठाण्यात तक्रारही दाखल करण्यात आली होती. मुस्लिम धर्मियांच्या भावना दुखावल्याने रझा अकादमीचे सदस्य वकास अहमद सगीर अहमद मलिक यांनी 30 मे रोजी भाजपच्या निलंबित नेत्या नुपूर शर्मावर भिवंडीतील शहर पोलीस ठाण्यात विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला होता.
रझा अकादमीच्या सदस्यांनी भिवंडी पोलीस ठाण्यात शिष्टमंडळासह वरिष्ठ पोलीस निरीक्षक चेतन काकडे यांची भेट घेऊन शर्मांवरील दाखल केलेल्या गुन्ह्याची चौकशी केली. त्यानंतर नुपूर शर्मा यांना 13 जून रोजी भिवंडी पोलीस ठाण्यात हजर राहण्याचे समन्स जारी करण्यात आले आहे.
विशेष म्हणजे त्यापाठोपाठ 4 जून रोजी भाजपचे निलंबित नेते नवीन जिंदल यांच्यावरही भिवंडी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून दोन दिवसापूर्वीच त्यांनाही 15 जून रोजी गुन्ह्यासंदर्भात पोलीस ठाण्यात हजर राहण्यास समन्स पाठविण्यात आले आहे. त्यामुळे दोघांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.