Barsu Refinery Protest: बारसू रिफायनरीविरोधात आंदोलन, आणखी तिघांना अटक

Barsu Refinery Project Protest : रत्नागिरी जिल्ह्यातील बारसू गावात रिफायनरीचं सर्वेक्षण सुरु आहे. याला स्थानिकांचा विरोध असून, आंदोलन सुरू आहे. रिफायनरीविरोधी संघटनेच्या आणखी तिघांना अटक करण्यात आली आहे. रिफायनरी सर्वेक्षणाला विरोध केल्याने राजापूर पोलिसांनी ही कारवाई केली आहे.  

सुरेंद्र गांगण | Updated: Apr 25, 2023, 10:34 AM IST
Barsu Refinery Protest: बारसू रिफायनरीविरोधात आंदोलन, आणखी तिघांना अटक title=
संग्रहित छाया

प्रणव पोळेकर / रत्नागिरी : रिफायनरीविरोधी संघटनेच्या आणखी तिघांना अटक करण्यात आली आहे. रत्नागिरीच्या बारसू गावात रिफायनरीचं सर्वेक्षण सुरु आहे. याला स्थानिकांचा विरोध असून, आंदोलन सुरू आहे. (Barsu Refinery Project protest) यावेळी विरोध संघटनेचे मुंबई अध्यक्ष वैभव कोळवणकरसह तिघांना अटक करण्यात आली आहे. रिफायनरी सर्वेक्षणाला विरोध केल्याने राजापूर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. अटक केलेल्या तिघांना रत्नागिरीमध्येच ठेवण्यात आले आहे. दरम्यान, बारसू  आंदोलनप्रकरणी पोलीस अधीक्षकांनी आंदोलकांना इशारा दिला आहे. तर आज रिफायनरीप्रकरणी माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज भूमिका मांडणार आहेत.

बारसू रिफायनरीच्या सर्वेक्षण बंदोबस्तासाठी निघालेल्या पोलिसांच्या गाडीला अपघात झाला. रत्नागिरीतल्या कशेळी बांध इथं पोलिसांची गाडी उलटली. त्यात 17 पोलीस जखमी झालेत. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहे. रिफायनरी सर्वेक्षणाला विरोध म्हणून बारसूत आंदोलन सुरू केले. या आंदोलनात एका आंदोलक महिलेला उष्माघाताचा त्रास झाला. या महिलेला इतर आंदोलकांनी रुग्णालयात हलवण्याचा प्रयत्न केला. मात्र या महिलेने रुग्णालयात जाण्यास नकार दिलाय. जीव गेला तरी चालेल रुग्णालयात जाणार नाही असं त्यांनी म्हटले आहे. 

बारसू रिफायनरी प्रकल्पासाठी सर्व्हे, 1500 पोलिसांचा फौजफाटा  

रत्नागिरीतील रिफायनरी सर्वेक्षणाचा आज दुसरा दिवस आहे. बारसूत सर्वेक्षण सुरु असून दुस-या दिवशीही ग्रामस्थ सड्यावर उपस्थित आहेत. कोणत्याही परिस्थितीत आम्ही हा प्रकल्प होऊ देणार नाही ही ठाम भूमिका ग्रामस्थांची आहे. सकाळच्या नाश्त्यासह दुपारच्या जेवणाची सोय ग्रामस्थांनी सड्यावरच केली आहे. कोणत्याही परिस्थितीत सर्वेक्षण करू दिले जाणार नाही, अशी भूमिका ग्रामस्थांची आहे. त्यामुळे सर्वेक्षणाचा वाद पेटण्याची शक्यता आहे.

'अशांतता माजवाल तर कारवाई होणारच !'

 बारसू रिफायनरी प्रश्नी कुणी अशांतता माजवण्याचा प्रयत्न केला तर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी दिलाय. रिफायनरीबाबत चर्चेनं प्रश्न सोडवण्याची आमची तयारी आहे. रिफायनरी करता सर्वेक्षण होणाऱ्या भागात केवळ परवानगी असलेल्यांनाच प्रवेश दिला जाईल अशी माहितीही पोलीस अधीक्षकांनी दिलीय.

कोकणात बारसू रिफायनरी प्रकल्पाच्या सर्वेक्षणाला जोरदार विरोध होतोय.. बारसुच्या सड्यावर रिफायनरी विरोधक जीवनावश्यक सामान आणि वस्तूंसह एकत्र जमले आहेत. राजापूर बारसू सोलगाव परिसरात आधीच जमावबंदी आदेश लागू करण्यात आले आहेत. ड्रिलिंग करण्यात येणाऱ्या एक किलोमीटर परिसरात  22 एप्रिल ते 31 मे पर्यंत हे मनाई आदेश असतील. सर्वेक्षणाला होणारा विरोध लक्षात घेता जवळपास दीड ते दोन हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.