पुणे : 'ब्लू व्हेल' या ऑनलाइन गेमने तरुणांना चांगलचं वेड लावल्याचं पहायला मिळत आहे. हा गेम खेळण्याच्या नादात एक अल्पवयीन मुलगा घर सोडून पळाल्याची घटना आता समोर आली आहे.
'ब्लू व्हेल' गेमचा टास्क पूर्ण करण्याच्या नादामध्ये सोलापूरातील एक १४ वर्षांचा मुलाने पुण्याची वाट पकडली. पण, पोलिसांनी या मुलाला भिगवण येथे ताब्यात घेतलं.
मिळालेल्या माहितीनुसार, हा तरुण सोलापूरात राहणारा असून त्याचे वडील व्यावसायिक आहेत. हा तरुण गेल्या अनेक दिवसांपासून ब्लू व्हेल गेम खेळत होता.
या गेमनुसार तो वागतही होता. गेम खेळण्याच्या नादात त्याने बुधवारी चक्क पुण्याच्या दिशेने रवाना झाला. हा मुलगा बसमधून पुण्याला जात असल्याची माहिती सोलापूर पोलिसांनी भिगवनण पोलिसांना दिली. तसेच तो ब्लू व्हेल गेम खेळत असल्याचंही कळवलं. यानंतर भिगवण पोलिसांनी तातडीने कारवाई करत बस स्थानक गाठलं आणि या मुलाला ताब्यात घेतलं. यानंतर त्याच्या पालकांच्या स्वाधीन केले.
ब्लू व्हेल या ऑनलाइन गेमचं लोण आता संपूर्ण महाराष्ट्रात पसरत असल्याचं पहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी मुंबईतील एका तरुणाने याच गेममधील टास्क पूर्ण करण्यासाठी आत्महत्या केली होती. या सर्व प्रकारांमुळे पालकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.