पुणे: खेकडे पकडण्याचा मोह जीवावर बेतला! सख्ख्या बहीण-भावाचा ओढ्यात बुडून मृत्यू

Brother And Sister Drown In Water: पोलिसांनी गावकऱ्यांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढले. या दोघांचे मृतदेह बाहेर काढले तेव्हा घरच्यांनी हंबरडा फोडला. गावकऱ्यांनाही या दोन्ही चिमुकल्यांचा मृतदेह पाहून अश्रू अनावर झाले.

स्वप्निल घंगाळे | Updated: Aug 4, 2023, 11:45 AM IST
पुणे: खेकडे पकडण्याचा मोह जीवावर बेतला! सख्ख्या बहीण-भावाचा ओढ्यात बुडून मृत्यू title=
दोघेही सकाळीच ओढ्यावर खेकडे पकडण्यासाठी गेले होते (फोटो प्रातिनिधिक सौजन्य युट्यूब)

Brother And Sister Drown In Water: पावसाळ्यामध्ये खेकडे पाकडण्याची अनेकांना हौस असते. अगदी नदी, नाल्यांपासून ओढ्यांमध्येही खेकडे पकडण्यासाठी अनेकांची जणू स्पर्धाच लागलेली असते. मात्र अशीच हौस एका सख्ख्या बहीण भावाच्या जीवावर बेतली आहे. ओढ्यात खेकडे पकडण्यासाठी गेलेल्या भावा-बहिणीचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना पुण्यामधील आंबेगाव तालुक्यातील गंगापूरमध्ये घडली आहे. शुक्रवारी सकाळी हे दोघे खेकडे पकडण्यासाठी गेले होते. दोघांचेही मृतदेह ओढ्यातून बाहेर काढण्यात आले आहेत. घोडेगाव पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत.

बहीण 14 वर्षांची तर भाऊ 12 वर्षांचा

गंगापूरमधील गाडेकरवाडीमध्ये राहणाऱ्या काळे कुटुंबावर घरातील 2 चिमुकल्यांना गमावल्याने दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मरण पावलेल्या मुलीचं नाव अंजली काळे असं असून ती 14 वर्षांची होती. तर अंजलीबरोबर खेकडे पकडण्यासाठी गेलेला तिचा 12 वर्षीय भाऊ दिगूचाही मृत्यू झाला आहे. खेकडे पकडण्यासाठी हे दोघे ओढ्याच्या काठावर गेले. खेकडे पकडत असतानाच दिगूचा पाय घसरला आणि तो ओढ्यात पडला. लहान भावाला वाचवण्यासाठी अंजलीने पोहता येत नसतानाही ओढ्यात उडी मारली. मात्र दोघांच्या उंचीपेक्षा पाण्याची खोली फारच अधिक असल्याने दोघेही बुडू लागवले. त्यांनी मदतीसाठी आरडाओरड केला. मात्र आजूबाजूला मदतीसाठी कोणी नसल्याने दोघांचा बुडून मृत्यू झाला. 

गावकऱ्यांच्या मदतीने बाहेर काढले मृतदेह

घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी ओढ्याकडे धाव घेतली. पोलिसांनाही फोनवरुन यासंदर्भात कळवण्यात आलं. पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलीस घटनास्थळी दाखल होईपर्यंत ओढ्याच्या काढावर गावकऱ्यांनीही मोठी गर्दी केली होती. गावकऱ्यांच्या मदतीने दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. आपल्या मुलांचे मृतदेह पाहून काळे कुटुंबाला शोक अनावर झाला. काळे कुटुंबातील माहिला हंबरडा फोडून रडत होत्या. गावकऱ्यांनाही या दोघा चिमुकल्यांचे मृतदेह पाहून अश्रू अनावर झाले. मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. 

सावध राहणं महत्त्वाचं

असाच प्रकार काही दिवसांपूर्वी नांदेडमध्ये घडला होता. येथे 1 ऑगस्ट रोजी रात्रीच्या वेळी खेडके पकडण्यासाठी गेलेल्या एका तरुणाचा ओढ्यात वाहून गेल्याने मृत्यू झाला. मुखेडमधील सकनूर गावात ही घटना घडली होती. राज्यातील अनेक भागांमध्ये मागील काही आठवड्यांपासून जोरदार पाऊस झाल्याने अनेक गावांमध्ये नदी, नाले तुडूंब भरुन वाहत आहेत. पाण्याचा प्रवाह अधिक असल्याने पाण्याच्या खोलीचा आणि वेगाचा अंदाज न आल्याने काठावर उभे असलेल्या व्यक्ती वाहून जण्याचे प्रकार अशावेळेस घडतात. त्यामुळेच अशावेळी नदी, नाल्यांजवळ किंवा पाणवठ्याजवळ जाताना सावध राहणं आवश्यक असतं.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x